कोकणचा हापूस थेट ग्राहकांच्या दारात, मध्यस्थांची साखळी खंडित
By नामदेव मोरे | Published: May 2, 2024 08:00 PM2024-05-02T20:00:20+5:302024-05-02T20:01:06+5:30
ग्राहकांची फसवणूक थांबविण्यातही यश
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कोकणचा हापूस विक्रीसाठी फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीवर विसंबून न राहता आता शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठीचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. मुंबईस्थित कोकणवासीयांच्या मदतीने थेट ग्राहकांपर्यंत हापूस पोहोचविण्यात येत असून, या उपक्रमास ग्राहकांचाही प्रतिसाद वाढत आहे. मध्यस्थांची साखळी कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो व ग्राहकांनाही स्वस्त व उत्तम दर्जाचा हापूस मिळू लागला आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे ही हापूस आंब्याची देशातील सर्वांत प्रमुख बाजारपेठ आहे. सर्वाधिक आंबा याच परिसरात विकला जातो. यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती हा आंबा विक्रीसाठी एकमेव पर्याय होता; परंतु मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक वर्षी या उपक्रमास प्रतिसाद वाढत आहे. मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून स्थिरावलेले कोकणवासीय नागरिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांच्या मदतीने थेट ग्राहकांपर्यंत आंबा पाेहोचविला जात आहे. या उपक्रमाशी अनेक मुंबईकर जोडले जात आहेत. आपल्या संपर्कामधील नागरिकांकडून आंब्याची ऑर्डर नोंदविली जाते. शेतकऱ्यांना किती आंबे लागणार हे कळविले जाते. या मागणीप्रमाणे शेतकरी ट्रकमधून आंबे पाठवून देतात. प्रत्येक विभागात तो पाठविला जातो.
नवी मुंबईमध्ये सीवूड, वाशीसह शहरातील अनेक भागांत अशाप्रकारे कोकणातून थेट आंबा विक्रीसाठी येत आहे. मुंबईमध्येही आंबा महोत्सवाच्या माध्यमातून थेट आंबा ग्राहकांपर्यंत पोहोचविला जात आहे.
ग्राहकांना खात्रीशीर कोकणचा हापूस- सद्य:स्थितीमध्ये मार्केटमध्ये कोकणच्या हापूसच्या नावाखाली कर्नाटकचा हापूस देण्याचे प्रकारही वाढले आहेत. प्रत्येक आंब्याला देवगडचा हापूस असल्याचे दाखविले जात आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असते. आंबा महोत्सव व थेट शेतकरी ते ग्राहक योजनेमध्ये ग्राहकांना खात्रीने कोकणचा हापूस उपलब्ध होत आहे.
कोरोना काळापासून आम्ही देवगडचा हापूस थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम सुरू केला. सी-वूडमधील कवी कुसुमाग्रज वाचनालयाचीही या उपक्रमास साथ मिळते. प्रत्येक वर्षी या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.- भूषण मालवणकर- सी-वूड