नवी मुंबई- मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना रेल्वे सेवा उशिराने सुरू असल्याचा फटका बसतो आहे. मध्य रेल्वे मार्गावर सकाळी गाड्यांचा खोळंबा झाल्यानंतर हार्बर रेल्वेवरील प्रवाशांनाही त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. हार्बर रेल्वेच्या बेलापूर स्टेशनजवळ ओव्हरहेड व्हायर तुटल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अप-डाऊन मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सकाळी 9.55 वाजता बेलापूर इथे डाउन मार्गावर ओव्हर हेड वायर तुटल्याने पनवेल-वाशी अप डाउन वाहतूक बंद झाली आहे. 4 दिवसीय ब्लॉक घेऊन देखील 5 व्या दिवशी पुन्हा लोकल रखडल्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.
याचा फटका ट्रान्स हार्बर मार्गालाही बसला असून तेथे प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, सीएसटी ते वाशीदरम्यान वाहतूक सुरू असल्याचं समजतं आहे. दरम्यान, बिघाड दुरूस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच बिघाड दुरूस्त होईल, अशी माहिती पनवेल लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे. उरण-बेलापूर मार्गाच्या कामासाठी गेल्या चार दिवसांपासून हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्या काळातही प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यात आता मेगाब्लॉक संपला तरी प्रवाशांचे हाल मात्र अजून संपलेले नाहीत.
दरम्यान, मंगळवारी सकाळी मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही रेल्वे सेवेच्या विलंबाला सामोरं जावं लागलं.मध्य रेल्वे मार्गावर मुंबईहून बदलापूरच्या दिशेनं लोकलखाली येऊन एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला. मृत पावलेल्या महिलेचं नाव सीताबाई सोळंकी (वय 45 वर्ष) असे असून त्या परभणी जिल्ह्यातील रहिवासी होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगी व दिर असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिक साठे यांनी लोकमतला दिली आहे. लोकलखालून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला होता. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक प्रभाविक झाली असून सेवा 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावत आहे. शिवाय, इंद्रायणी एक्स्प्रेसदेखील रखडली होती.