लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील जुईनगर स्थानकात गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे अप-डाऊन मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली. या बिघाडामुळे हार्बर मार्गावरील ४० लोकलच्या फेऱ्या रद्द तर ३५ लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागला. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.
सिग्नल यंत्रणेतील बिघाड ७ वाजता दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरू झाली तरी लोकल खोळंबून राहिल्याने एकामागोमाग एक उभ्या होत्या. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी ४० लोकलच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या तर ३५ फेऱ्या उशिराने धावत होत्या, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
ऐन सकाळी ही घटना घडल्याने नोकरदारांना याचा फटका बसला. प्रत्येक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. यात विद्यार्थी, ज्येष्ठांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला.
लोकल विलंबाच्या घटना७ ऑक्टोबर : पावसामुळे रेल्वेच्या सर्व मार्गांवर सेवा विस्कळीत पश्चिम रेल्वे १५-२० मिनिटे तर मध्य रेल्वे ५७ मिनिटे उशिराने११ ऑक्टोबर : पावसामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ७ ते १० मिनिटे उशिराने२७ ऑक्टोबर : मध्य रेल्वेच्या अंबरनाथ-कर्जत मार्गावर तांत्रिक बिघाड; रेल्वेसेवा १०-१५ मिनिटे उशिराने- २९ ऑक्टोबर : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-टिटवाळा दरम्यान ठाणे स्थानकात तांत्रिक बिघाड; रेल्वेसेवा १०-१५ मिनिटे उशिराने- ४ नोव्हेंबर : पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड; रेल्वेसेवा १५ ते २० मिनिटे उशिराने- ९ नोव्हेंबर : पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरी स्थानकात तांत्रिक बिघाड; रेल्वेसेवा १० ते १५ मिनिटे उशिराने- ९ नोव्हेंबर : हार्बर मार्गावर धुक्यामुळे रेल्वेसेवा ८ ते १० मिनिटे उशिराने ७ डिसेंबर : मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड : १० ते १५ मिनिटे उशिराने- १५ डिसेंबर : हार्बर मार्गावरील जुईनगर रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड : १५ ते २० मिनिटे उशिराने