नवी मुंबई : हाथरस घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फे जुईनगर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी तलावात उतरून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील बलात्कार व हत्येच्या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली आहे. मात्र, या घटनेवर पांघरून घालण्याच्या प्रयत्नात उत्तर प्रदेश सरकार असल्याच्या टीका होत आहेत. दरम्यान, पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्यासह प्रसारमाध्यमांनाही अडवण्यात आले होते. त्यामुळे भाजप सरकारच्या विरोधात असंतोष व्यक्त होत आहे. तो व्यक्त करण्यासाठी नवी मुंबई काँग्रेसतर्फे नेरुळ येथील चिंचोली तलावात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवक्ते रवींद्र सावंत, विद्या भांडेकर, श्वेता मोरे, दिनेश गवळी, स्वप्निल दरेकर, राजेश भंबुरे आदी उपस्थित होते. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तलावात उतरून मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली, तसेच या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून कठोर शिक्षेचीही मागणी केली.सीबीडीत निषेध : काँग्रेसच्या वतीनेच सीबीडी येथेही हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून आंदोलन केले. यावेळी प्रदेश पदाधिकारी नीला लिमये, जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक, सुदर्शना कौशिक, डॉ.मनोज उपाध्याय, एजाज हुसेन, सचिन नाईक, रत्नाकर कुदळे, प्रशांत वाघ आदी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाथरस घटनेचा निषेध केला, तसेच राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून झालेल्या धक्काबुकीप्रकरणी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
Hathras Case: काँग्रेसतर्फे हाथरस घटनेचा निषेध; जुईनगरमध्ये तलावात केले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 11:39 PM