नवी मुंबई : महापालिकेने फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी शहराच्या विविध भागांत फेरीवाला क्षेत्र विकसित केले आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी आवश्यकतेनुसार पक्के गाळे बांधले आहेत. त्या त्या विभागातील परवानाधारक फेरीवाल्यांना या गाळ्यांचे वाटप करण्याची योजना आहे; परंतु गाळे तयार असूनही अद्यापि त्यांचे वाटप न झाल्याने फेरीवाल्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोपरखैरणे विभागात महापालिकेच्या वतीने २३ ठिकाणी फेरीवाला क्षेत्र विकसित करण्यात येणार आहेत. त्यापैकी काही भागांतील मार्केट बांधून तयार आहेत. कोपरखैरणे विभागात एकूण ४२२ परवानाधारक फेरीवाले आहेत. यात भाजी, फळ व मांस विक्रेत्यांचा समावेश आहे; परंतु परवानाधारक आणि विनापरवाना फेरीवाल्यांसंदर्भात महापालिकेचे अद्यापि धोरण निश्चित झालेले नाही. त्यामुळे ऐनवेळी परवानाधारकांना डावलून वर्षेनुवर्षे एकाच जागेवर व्यवसाय करणाऱ्या विनापरवाना फेरीवाल्यांना गाळे वाटप होण्याची भीती व्यक्त होत आहे. कोपरखैरणे विभागातील सेक्टर ८ मध्ये फेरीवाला भूखंडावर मंडई उभी करण्यात आली आहे. यात ९५ ओटले आहेत. त्यापैकी २६ ओटले हे मासे विक्रेत्यांसाठी व उर्वरित भाजी व इतर विक्रेत्यांसाठी आहेत. सेक्टर ३ मध्ये फेरीवाल्यांसाठी मार्केट बांधण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे सेक्टर १५, सेक्टर १६, या ठिकाणची कामेही प्रगतीपथावर आहेत. कोपरखैरणे सेक्टर ८मध्ये फळे व भाजीपाला विक्रेत्यांसाठी मंडई उभारण्यात आली आहे; परंतु फेरीवाल्यांना अद्यापि त्यातील गाळ्यांचे वाटप करण्यात आलेले नाही.गेल्या २0 वर्षांपासून सेक्टर ५ ते ८मधील फळे, भाजी आणि मांस विक्रेत्यांसाठी मार्केट उभारावे, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. त्यानुसार महापालिकेने फेरीवाला क्षेत्रासाठी राखीव असलेल्या भूखंडावर मार्केट बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. विशेष म्हणजे, मागील दोन वर्षांपासून ही मंडई बांधून तयार आहे; परंतु त्याचे फेरीवाल्यांना हस्तांतरण केले जात नाही. एकूणच स्थानिक फेरीवाल्यांना हद्दपार करण्याचा सिडकोचा डाव असल्याचा आरोप श्री गणेशजी फेरीवाला वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र म्हात्रे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
फेरीवाला क्षेत्रातील गाळ्यांचे वाटप रखडले
By admin | Published: April 13, 2017 2:58 AM