नवी मुंबई : वाशी विभागातील सेक्टर ९, १०, १५ आणि सेक्टर १६ यासारख्या नागरिकांच्या वर्दळीने गजबजलेल्या रहिवासी भागामधील पदपथावर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. फेरीवाल्यांच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, पालिकेचा अतिक्र मण विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
नवी मुंबई शहरातील वाशी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या नोडमध्ये विविध शाळा, महाविद्यालये, मॉल, मार्केट, सिनेमागृह, एपीएमसी बाजारपेठ, रु ग्णालये, आयटी कंपन्या, शोरूम, विविध कार्यालये आदीमुळे कामानिमित्त या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. वाशी विभागात नागरिकांच्या वर्दळीचा फायदा पदपथावर व्यवसाय करणाºया नागरिकांनाही मोठ्या प्रमाणावर होत असल्याने नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणचे पदपथ फेरीवाल्यांनी काबीज केले आहेत.सेक्टर ९, १०, १५ आणि सेक्टर १६ या ठिकाणचे पदपथ व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर व्यापल्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणेही जिकरीचे झाले आहे. पालिकेच्या विभाग कार्यालयाशेजारील पदपथावर देखील विविध खाद्य पदार्थ, कापडविक्रेते आदीच्या हातगाड्या थाटल्या जात आहेत. फेरीवाल्यांनी पदपथावर थाटलेल्या दुकानांमुळे या ठिकाणाला संध्याकाळी जत्रेचे रूप येत असून, या विभागात राहणाºया नागरिकांना, तसेच कामानिमित्त ये-जा करणाºया नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे परिसरात कचºयाचे साम्राज्य पसरत असून, फेरीवाल्यांकडून सांडपाणी गटारांमध्ये सोडले जात आहे. परिसरात दुर्गंधी वाढली असून, त्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. वाशीतील पदपथावर व्यवसाय करण्यासाठी काही व्यावसायिकांनी पदपथावरील जागांवर हक्क दाखवीत जागा निश्चित करून ठेवल्या असून, त्या इतर व्यावसायिकांना वापरासाठी भाड्याने दिल्या आहेत. वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना होणारी अडचण लक्षात घेता महापालिकेच्या माध्यमातून वाशी बस डेपोच्या शेजारी व्यवसाय करण्यासाठी जागा दिल्या होत्या; परंतु या ठिकाणी व्यवसाय होत नसल्याचे कारण सांगत, या व्यावसायिकांनी दोन्ही जागांवर व्यवसाय थाटले आहेत. या संदर्भात पालिकेचे वाशी विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.