नवी मुंबईत प्रसिद्धीपासून दूर राहात कर्तव्यभावनेतून यांनी केली मदत; पैशांची अपेक्षा न करता, दिली अखंड सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 11:54 PM2021-04-26T23:54:48+5:302021-04-26T23:54:55+5:30
पैशांची अपेक्षा न करता, दिली अखंड सेवा
नवी मुंबई : कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून ते एक वर्षानंतर दुसरी लाट सरु होईपर्यंत अनेक संस्था व व्यक्ती प्रसिद्धीपासून दूर राहात जनसेवा करत आहेत. रोडवरील नागरिकांना जेवण देण्यापासून ते रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यापर्यंत जी शक्य होईल ती मदत केली जात आहे. काही प्राण्यांवर मोफत उपचार करत आहेत, तर काही मृत्यू झालेल्या कोरोनाग्रस्तांवर विधीवत अंत्यसंस्कार करत आहेत. एक वर्षापेक्षा जास्त काळ अखंडपणे जनसेवा करणाऱ्यांमुळेच या आणीबाणीच्या स्थितीतून बाहेर येणे हजारो सर्वसामान्य नागरिकांना शक्य झाले आहे.
कोरोनाकाळात मुंबई, नवी मुंबईमधील ४ हजारपेक्षा जास्त पक्षी, प्राण्यांवर उपचार केले. एक वर्षापूर्वी कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यानंतर रोडवर कुत्री, भटकी जनावरे, गोशाळेतील गाई, जखमी पक्षी यांच्यावर वेळेत, योग्य व मोफत उपचार करण्यासाठी भूमी जीवदया संस्थेच्या रुग्णालयामार्फत आम्ही काम सुरू केले. प्रत्येक महिन्याला जवळपास १२५ कुत्र्यांवर उपचार केले जात आहेत. नवी मुंबई, खारघर, पनवेल परिसरातील गोशाळेतील गाईंवरही मोफत उपचार केले असून, वर्षभर प्रत्येक महिन्याला ३०० ते ४०० प्राणी, पक्ष्यांवर उपचार केले असून, हे काम अखंडपणे सुरू आहे.
मधुकर शिंदे - वर्षभरात दीड लाख नागरिकांना जेवण
आधार फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्षांपासून नियमित अन्नदान करत आहोत. कोरोना सुरू झाल्यानंतर मनपा रुग्णालय, रोडवरील बेघर नागरिक व झोपडपट्टी परिसरात आम्ही अन्नछत्र सुरु केले. नियमितपणे अन्नदान करत असून, वर्षभरात दीड लाखपेक्षा जास्त नागरिकांना जेवण पुरविण्यात आले आहे. याशिवाय कोरोना रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिकेचा उपक्रमही राबविला.
बिपीन शहानंद - उपचार मिळवून दिले
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होेते. आम्ही नियमित रक्तदान शिबिरे घेऊन व इतर वैद्यकीय सुविधा देत असतो. कोरोनाकाळात रुग्णांना बेड उपलब्ध करुन देणे, औषधे मिळवून देणे, कोरोना चाचणी करण्यापासून ते रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास सुरुवात केली. वर्षभरात ६०० पेक्षा जास्त रुग्णांना सर्वांच्या सहकार्याने मदत उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय नियमित रक्तदान शिबिरांचेही आयोजन केले जात आहे.
सुनील वाघेला- अंत्यसंस्कारासाठी सहकार्य
महानगरपालिकेच्या रुग्णालयात आम्ही काम करतो. एक वर्षभरापूर्वी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर आम्हालाच अंत्यसंस्कार करावे लागायचे. नातेवाईक उपस्थित राहू शकत नव्हते. मृतदेह फक्त जाळण्यापेक्षा त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यास आम्ही प्रारंभ केला. आता नातेवाईक उपस्थित असतात. त्यांना धीर देऊन सुरक्षितपणे अंत्यदर्शन घेऊन देण्यासाठीही सहकार्य करतो. वर्षभरात आम्ही चार ते पाच जणांनी ६०० पेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले असून, हे काम सुरुच आहे.