जव्हार : येथील हातेरी या अतिदुर्गम भागातील अनाथ आणि अपंग विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ५९ टक्के गुण मिळवून पुढच्या शिक्षणाचे स्वप्न पाहिले असले तरी, पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी आल्यावर त्याला महाविद्यालयात प्रवेश तर मिळाला, परंतु वसतिगृहातील प्रवेश मात्र नाकारला गेला. नव्हे तर त्याला अक्षरश: हाकलून लावण्यात आले. जव्हारमधील हा प्रकार उघड झाल्याने संताप व्यक्त होत आहे.या पीडित विद्यार्थ्याचे नाव श्रीराम काकड्या गवते असून शिक्षक होण्याचे ध्येय आहे. त्याला जव्हार येथील कॉलेजमध्ये तेरावीच्या वर्गात प्रवेश मिळाला. परंतु, जव्हारपासून २० किमी अंतरावरून प्रवास करून कॉलेजचे शिक्षण घेणे त्याला अशक्य असल्याने त्याने जव्हार येथील आदिवासी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी लेखी व आॅनलाइन अर्जदेखील दिला होता. अपंगासाठी राखीव जागा असल्याने त्याचा वसतिगृहातील प्रवेश नक्की होता.महाविद्यालय सुरू होऊन १५ दिवस झाल्यानंतर आपल्या सामानासह तो १५ जुलै रोजी सकाळीच वसतिगृहाच्या कार्यालयात हजर झाला. त्याच्या प्रवेशाची वसतिगृहातील कार्यालयात नोंददेखील झाली असल्यामुळे आपल्या सामानासह कार्यालयात हजर झाला. परंतु, तेथील गृहपाल बी.आर. गायकवाड यांनी त्यास अजून प्रवेशाची यादी लागली नाही. यादी लागल्यावर ये, असे उद्धटपणे सुनावले व श्रीरामला हाकलून दिले. काठीच्या आधाराने एका पायावर चालणाऱ्या श्रीराम यास सामानासह बाहेर काढल्यामुळे तो गेटच्या बाहेर रडत बसला. ही वार्ता जव्हार तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कमळाकर धूम, दयानंद लहारे यांना समजताच त्यांनी जव्हार शासकीय मुलांच्या वसतिगृहात धडक देऊन श्रीराम यास आधार दिला व तत्काळ या संतापजनक प्रकाराची माहिती जव्हार प्रकल्प अधिकारी लोमेश सलामे यांना देऊन श्रीराम यास वसतिगृहात राहण्याची परवानगी न दिल्यास कार्यालयाच बसून आंदोलन करू, असा इशारा दिला. (वार्ताहर)लालफितीचा अजब प्रकारआंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रकल्प कार्यालयातील अधिकारी खडबडून जागे झाले व सलामे यांनी गृहपाल बी.आर. गायकवाड यांना फोन करून श्रीरामला प्रवेश देण्याचे आदेश दिले. मात्र, जव्हार शासकीय वसतिगृहातील गृहपाल आर.पी. गायकवाड हे ट्रेनिंगसाठी बाहेरगावी गेले असल्याने जव्हार येथील नवीन शासकीय वसतिगृहातील गृहपाल बी.आर. गायकवाड यांच्याकडे चार्ज असल्याने त्यांना या प्रवेशासंबंधी कल्पना नसल्याची माहिती प्रकल्प कार्यालयाने दिली. मात्र, जर एखादा अपंग विद्यार्थी दूर ग्रामीण अंतरावरून जेव्हा येतो, तेव्हा त्याला सन्मानाची वागणूक देऊन राहण्याची परवानगी द्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कमळाकर धूम यांनी दिली.
‘त्याला’ वसतिगृहाने लाथाडले
By admin | Published: July 17, 2015 11:30 PM