नवी मुंबई : महापालिकेच्या माध्यमातून वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये उभारण्यात आलेले बाराशे खाटांचे कोविड-१९ रुग्णालय आजपासून सुरू होत आहे. गुरुवारपासून या रुग्णालयात कोविडच्या रुग्णांवर उपचार सुरू केले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली. त्यामुळे इतर उपचार केंद्रांवरील ताण कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
नवी मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे १२0३ रुग्ण महापालिकेने उभारलेल्या विविध केंद्रांत उपचार घेत आहेत. सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या रुग्णालयामुळे शहरातील अन्य उपचार केंद्रांवरील रुग्णांचा ताण कमी होणार आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन उद्घाटनाची कोणतीही औपचारिकता न करता गुरुवारपासून हे रुग्णालय खुले करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार गुरुवारपासून कोविडच्या रुग्णांना या रुग्णालयात थेट प्रवेश दिला जाणार असल्याचे आयुक्त मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे. या रुग्णालयात गंभीर रुग्णांवर तूर्तास उपचार केले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.कोरोनावर उपचार करण्यासाठी महापालिकेने त्रिस्तरीय आरोग्य रुग्णालय ही संकल्पना राबविली आहे. फ्ल्यू क्लिनिक, कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचा यात समावेश आहे. वाशी सेक्टर १४, सीबीडी सेक्टर ३, पनवेल येथील इंडिया बूल्स, नेरूळ येथील आगरी-कोळी भवन आणि घणसोली-सावली या ठिकाणी कोविड केअर सेंटर आहेत. या ठिकाणी कोविडचे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. तर तीव्र लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांवर नेरूळ येथील तेरणा हॉस्पिटल, सीबीडी येथील अपोलो हॉस्पिटल आणि महापालिकेच्या वाशी येथील प्रथमसंदर्भ रुग्णालयात उपचार केले जातात. कोरोनाचे संकट मोठे असले तरी पावसाळ्यात उद्भवणाºया साथीच्या रोगांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वाशीतील प्रथमसंदर्भ रुग्णालय सामान्य रुग्णांसाठी खुले करण्याच्या दृष्टीने विचारविमर्श सुरू असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.सिडको एक्झिबिशन कोविड रुग्णालयाची १२00 खाटांची क्षमता आहे. त्यापैकी ५00 खाटा आॅक्सिजन तर उर्वरित जनरल रुग्णांसाठी असणार आहेत. सध्या या रुग्णालयात तीव्र स्वरूपाची लक्षणे असणाºया रुग्णांवर उपचार केले जाणार नाहीत. १0 एप्रिल २0२0 रोजी या रुग्णालयाचे काम सुरू करण्यात आले होते. तब्बल दोन महिन्यांत हे काम पूर्ण झाल्याचे पालिका आयुक्त मिसाळ यांनी सांगितले.