नामदेव मोरे नवी मुंबई : शासनाने रिक्षा परवाने खुले केल्यापासून रिक्षांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. नवी मुंबईमध्ये ही संख्या तब्बल ३०,६५९ झाली आहे. स्टॅण्डवर लांबच लांब रांगा लागल्या असून, रेल्वे स्टेशनसमोर चक्काजामची स्थिती होत आहे. परवाने बंद न केल्यास प्रामाणिक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
नवी मुंबईमधील रिक्षाचालकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नेरुळमधील रिक्षाचालक दत्तात्रेय फडतरे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, वाणिज्य शाखेतून पदवीधर झालो. नोकरी मिळविण्यासाठी मुंबई गाठली. योग्य नोकरी न मिळाल्याने १२ वर्षांपूर्वी रिक्षा व्यावसायामध्ये आलो. दिवसातून ८ ते १२ तास रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित सुरू होता. शासनाने परवाने खुले केल्यामुळे नवी मुंबईमधील रिक्षांची संख्या जवळपास दुप्पट झाली. स्टॅण्डवरील रांगा वाढल्या व कुटुंबाचा खर्च चालेल एवढे पैसेही मिळणे बंद झाले. रिक्षा व्यवसाय बंद करून पुन्हा गावाकडे जाण्याची वेळ आली आहे. फडतरे यांच्या प्रमाणेच प्रतिक्रिया इतर रिक्षाचालकांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. शासनाच्या धोरणामुळे अनेक प्रामाणिक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने परवाने खुले करण्यापूर्वी नवी मुंबईमध्ये १७,२६५ रिक्षा होत्या. परवाने खुले केल्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली. वाढीव १३,३९४ परवाने देण्यात आले असून, रिक्षांची संख्या तब्बल ३० हजार ६५९ झाली आहे. अजूनही नवीन रिक्षांची भर यामध्ये पडत आहे.
रिक्षांची संख्या वाढली; परंतु त्या प्रमाणात नवीन स्टॅण्ड निर्माण करण्यात आले नाहीत. यामुळे आहेत त्याच स्टॅण्डवर नवीन रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. वाशी, सानपाडा, तुर्भे, नेरुळ, ऐरोली व इतर रेल्वे स्टेशनसमोर रोडवरही रिक्षा उभ्या कराव्या लागत आहेत. स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच चक्काजामची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ज्या स्टॅण्डवर दहा रिक्षा उभ्या करण्याची परवानगी व क्षमता आहे, त्या ठिकाणी २० ते २५ रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. नेरुळ सेक्टर २० मधील तलावाजवळ असलेल्या स्टॅण्डवर पूर्वी जास्तीत जास्त दहा रिक्षा उभ्या केल्या जात होत्या. सद्यस्थितीमध्ये सकाळी तेथे ३० ते ३५ रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. प्रत्येक स्टॅण्डवरील संख्या दुप्पट झाली आहे. पूर्वी दिवसभरामध्ये किमान एक हजार रुपयांची कमाई केली जात होती; परंतु सद्यस्थितीमध्ये ८ ते १२ तास रिक्षा चालवूनही ५०० ते ७०० रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळत नाहीत. इंधन व देखभालीचा खर्च वगळल्यास घरखर्च चालविण्याएवढे पैसेही श्ल्लिक राहत नाहीत.नवीन परवान्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आम्ही यापूर्वीच परवाने बंद करण्याची मागणी केली आहे. लवकरच परिवहनमंत्र्यांची भेट घेऊन तत्काळ परवाने थांबविण्याची मागणीही करणार आहे. शासनाने तत्काळ याविषयी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. - भरत नाईक, अध्यक्ष, नवी मुंबई रिक्षाचालक-मालक कृती समितीरिक्षा परवाने खुले केल्यामुळे प्रामाणिक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. १० ते १२ तास रिक्षा चालवूनही घरखर्च चालविण्याएवढे पैसे मिळत नाहीत. स्टॅण्डवर रिक्षांच्या रांगा वाढत आहेत. शासनाने तत्काळ नवीन परवान्यांचे वितरण थांबविले पाहिजे.- पद्माकर मेहेर, अध्यक्ष, नेरुळ विभाग, रिक्षाचालक-मालक कल्याणकारी संस्थानवीन परवाने रद्द करण्याची मागणी आम्ही यापूर्वीच परिवहनमंत्र्यांकडेही केली आहे. रिक्षांची संख्या जवळपास दुप्पट झाली असून त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. अशीच स्थिती राहिली तर प्रामाणिक चालकांवर उपासमारीची वेळ येईल. - दिलीप आमले, अध्यक्ष, नवी मुंबई रिक्षाचालक-मालक सेवाभावी संस्थारिक्षा परवाने खुले केल्यामुळे झालेले दुष्परिणाम
- नवी मुंबईसह पनवेलमध्ये रिक्षांची संख्या दुप्पट झाली
- रिक्षा स्टॅण्डवरील जागा अपुरी पडू लागली आहे.
- रेल्वे स्टेशन परिसरामध्ये वाहतूककोंडी वाढली
- रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर झाला परिणाम
- रिक्षाचालकांना कर्ज फेडणे व घरखर्च चालविणेही झाले अवघड