वाहनचोर बनले पोलिसांची डोकेदुखी
By admin | Published: April 9, 2017 02:52 AM2017-04-09T02:52:01+5:302017-04-09T02:52:01+5:30
तीन महिन्यांत शहरातून १०९ वाहने चोरीला गेली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक दुचाकींचा समावेश आहे. तर वाहनचोरीच्या घडलेल्या गुन्ह्यांपैकी उकल झालेल्या गुन्ह्यांचे
नवी मुंबई : तीन महिन्यांत शहरातून १०९ वाहने चोरीला गेली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक दुचाकींचा समावेश आहे. तर वाहनचोरीच्या घडलेल्या गुन्ह्यांपैकी उकल झालेल्या गुन्ह्यांचे प्रमाण अल्प असल्यामुळे पोलिसांपुढे तपासाचे आव्हान वाढले आहे.
शहरात वाहनचोरीच्या घटना वाढतच असून त्यास आवर घालण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. नाकाबंदी, गस्त, जनजागृती यांसह इतरही अनेक पर्याय वापरूनही वाहनचोरीच्या घटना कमी झालेल्या नाहीत. सन २०१५मध्ये शहरातून एकूण ५९४ वाहने चोरीला गेलेली. त्यापैकी अवघ्या १४२ वाहनांचा शोध लागला होता. वाहनचोरीच्या या गुन्ह्यात गतवर्षी ८२ गुन्ह्यांनी वाढ होऊन २०१६मध्ये ६७६ वाहनचोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अशातच चालू वर्षाच्या अवघ्या तीन महिन्यांत शहरातून १०९ वाहने चोरीला गेली आहेत. त्यात कार, ट्रक यांसह दुचाकींचा सर्वाधिक समावेश आहे. त्यापैकी काही गुन्ह्यांची वेळीच उकलही झालेली आहे. शहरात घडणाऱ्या इतर गुन्ह्यांच्या तुलनेत वाहनचोरीचे गुन्हे सर्वाधिक आहेत. चोरीच्या वाहनांची शहराबाहेर सहज विल्हेवाट लावणे शक्य असल्याने या गुन्ह्यात परराज्यातील टोळ्या सक्रिय असल्याचे काही प्रकरणांमध्ये दिसूनही आलेले आहे. मात्र, अद्यापही या टोळ्यांवर कायद्याचा धाक निर्माण करण्यात व घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना फारसे यश आलेले नाही.
वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये सराईत टोळ्यांसह काही बालगुन्हेगारांचाही समावेश आहे. ज्या बालगुन्हेगारांनी हौसेपोटी दुचाकी चोरल्या होत्या, अशांचा तपास लागला आहे; परंतु सराईत टोळ्यांना अटकाव घालण्यात पोलिसांना फारसे यश आल्याचे दिसत नाही. शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदीच्या माध्यमातून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनाही या वाहनचोर टोळ्या चकमा देत आहेत. त्यामुळे चोरीची वाहने नेमकी जातात कुठे? असा प्रश्न वाहनमालकांसह पोलिसांना सतावत आहे. अशातच वाहनचोरांवर कायद्याची धाक निर्माण होत नसल्यामुळे वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम पोलिसांनी राबवली. हा उपक्रम स्तुत्य असला तरीही नागरिकांकडून मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आजही रहदारीच्या मार्गावर अथवा मोकळी जागा भेटेल त्या ठिकाणी वाहने उभी केल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे अधिकृत पार्किंगस्थळ ओस पडत असून रस्त्यांवर मात्र कोंडी होत आहे. याच संधीचा फायदा वाहनचोरांकडून घेतला जात असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत चालली आहे.
चोरीचे वाहन एखाद्या गुन्ह्यासाठी वापरले गेल्यासही पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण होऊ शकते.
सोनसाखळी चोरी, दरोडे अशा गुन्ह्यांसाठी चोरीची वाहने वापरली जात आहेत. त्यामुळे घटनास्थळी सीसीटीव्हीमध्ये जरी गुन्ह्याचा प्रकार चित्रित झाला, तरीही वापरलेले वाहन चोरीचे असल्यामुळे पोलिसांना तपासात अडथळा निर्माण होतो. सीवूड येथील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर पडलेल्या दरोड्यातही चोरीची कार वापरण्यात आली होती. यामुळे सुरुवातीचे काही दिवस पोलीस तपासकाम दिशाहीन झाले होते.
वाहनचोरीच्या घटनांना आवर घालण्यासाठी पोलिसांचे अॅनेलेसेस पथकही कार्यरत आहे. त्यांच्याद्वारे वाहनचोरांची ओळख पटवून त्यांना पकडण्याच्या दृष्टीने तपास केला जातो. त्यांच्याकडून सीसीटीव्हीच्या तपासाद्वारे काही गुन्हेगारांना अटकही करण्यात आलेली आहे. त्यानंतरही शहरात वाहनचोरीच्या घटना सुरूच आहेत.