बेवारस वाहनांची डोकेदुखी, वाहतुकीला अडथळा, कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 04:00 AM2018-04-08T04:00:27+5:302018-04-08T04:00:27+5:30

पनवेल परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्याच्या कडेला गेली अनेक वर्षे शेकडो बेवारस वाहने उभी आहेत. या वाहनांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रुग्णवाहिका, स्कूलबसेस व अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.

 Headless vehicle headaches, obstruction of traffic, action demand | बेवारस वाहनांची डोकेदुखी, वाहतुकीला अडथळा, कारवाईची मागणी

बेवारस वाहनांची डोकेदुखी, वाहतुकीला अडथळा, कारवाईची मागणी

googlenewsNext

- मयूर तांबडे

पनवेल : पनवेल परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्याच्या कडेला गेली अनेक वर्षे शेकडो बेवारस वाहने उभी आहेत. या वाहनांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रुग्णवाहिका, स्कूलबसेस व अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या बेवारस वाहनांचा बंदोबस्त करण्याची मागणी पनवेलकरांकडून करण्यात येत आहे.
सध्या शहरात वाहतूककोंडी आणि पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. शहरी व ग्रामीण अशा दोन भागांत सामावलेल्या या शहरात वाहनतळाचे नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जात आहेत. विशेष म्हणजे, वाढत्या शहरीकरणाबरोबर येथे वाहनांची संख्याही वाढत आहे. दुचाकी वाहनांचे यात प्रमाण मोठे आहे. बहुतांशी सोसायट्यांत पार्किंगसाठी जागा नसल्याने दुचाकीसह चारचाकी वाहने सर्रासपणे रस्त्यावर पार्क केली जातात. रस्त्यांच्या दुतर्फा पार्क केलेल्या या वाहनांत बेवारस वाहनांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्षे पडून आहेत. या वाहनांचा गैरवापर समाजकंटकांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वाहनांवर वाहतूक पोलीस, महापालिकेने तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र, कारवाई तर दूरच, या वाहनांकडे ढुंकूनही पाहिले जात नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या वाहनांमुळे रस्त्यावरील इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. शहराच्या प्रत्येक भागात रस्त्याच्या बाजूला भंगार वाहने दिसून येत आहेत. प्रशासनाने दखल घेऊन वाहने लवकरात लवकर हलवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
पनवेल परिसरात हजारोंच्या संख्येने गॅरेजेस असून, तेथेही मोठ्या संख्येने नादुरु स्त वाहने उभी आहेत. नादुरु स्त वाहनांचे सुटे भाग अन्य वाहनात वापरण्यासाठी गॅरेजमालक त्यांची खरेदी करतात; परंतु सुटा भाग वापरला तरी ही वाहने वर्षांनुवर्षे गॅरेजमधील जागा अडवून बसतात. शहरातील काही रस्त्यांवर कोणत्याही कारवाईची भीती न बाळगता, सर्रासपणे नादुरु स्त, अपघातग्रस्त वाहने उभी करण्यात आली आहेत. या प्रकारामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होऊन रस्तेही मर्यादित झाले आहेत, तसेच शहराच्या विद्रूपीकरणातही भर पडत आहे. या बेवारस वाहनांचा दैनंदिन स्वच्छतेला अडथळा निर्माण होत आहे.
यासंदर्भात ठोस कार्यवाही करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.

- रस्त्यावर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात येईल, असे पनवेल महापालिकेने २८ जानेवारी २०१८ रोजी जाहीर केले होते; परंतु अडीच महिने उलटून गेले, तरी यासंदर्भात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.

पनवेल वाहतूक शाखा व आरटीओला या वाहनांवर कारवाई करण्यासाठी मागच्या आठवड्यात कळवले आहे. जसजशी यादी आली, तसतशी ती त्यांना कळविण्यात आली आहे.
- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महापालिका

Web Title:  Headless vehicle headaches, obstruction of traffic, action demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल