पनवेल महापालिकेचे मुख्यालय टाकणार कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 03:56 AM2018-11-19T03:56:29+5:302018-11-19T03:56:38+5:30
पनवेल महानगर पालिकेचे मुख्यालय कात टाकणार आहे. सध्याच्या घडीला दोन वेगवेगळ्या इमारतींच्या माध्यमातून प्रशासनाचे कामकाज चालत आहे.
- वैभव गायकर
पनवेल : पनवेल महानगर पालिकेचे मुख्यालय कात टाकणार आहे. सध्याच्या घडीला दोन वेगवेगळ्या इमारतींच्या माध्यमातून प्रशासनाचे कामकाज चालत आहे. या दोन्ही इमारतींना विशेष पद्धतीने एकसंघ करून या दोन्ही इमारती एकच असल्याचा भास या नव्या प्रस्तावानुसार निर्माण केला जाणार आहे.
पनवेल महापालिकेची स्थापना दोन वर्षांपूर्वी झाली आहे. तत्पूर्वी याठिकाणी नगरपरिषद अस्तित्वात होती. १८५२ साली स्थापन झालेली महाराष्ट्रातील ही पहिली नगरपरिषद होती. पनवेल शहरात देवाळे तलावासमोरच असलेल्या इमारतीतून नगरपरिषदेचे कामकाज चालत असे. २0१६ मध्ये नगरपरिषदेचे रूपांतर महापालिकेत करण्यात आले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने जुन्या इमारतीच्या बाजूलाच आणखी एक नवीन इमारत बांधण्यात आली. या नव्या इमारतीत महापौर, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते, विषय समित्यांचे सभापतींची दालने तयार करून त्याठिकाणाहून कामकाज सुरू करण्यात आले, तर जुन्या इमारतीत प्रशासकीय अधिकाऱ्यांची दालने आहेत. यात आयुक्त, उपायुक्त, विविध विभाग अधिकाºयांच्या दालनाचा समावेश आहे. या दोन्ही इमारतींना जरी पालिकेचे मुख्यालय संबोधले जात असले तरी या दोन वेगवेगळ्या इमारती आहेत. त्यामुळे अनेकदा संभ्रम निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर आजूबाजूला असलेल्या या दोन इमारती एकसंघ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तशा आशयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
मुख्यालयाच्या जागेसाठी पालिका प्रशासन व सिडको यांच्यात चर्चा सुरू आहेत. जागा निश्चित झाल्यानंतर त्यावर मुख्यालयाची इमारत उभारण्यसाठी पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. या काळात कामकाजात होणारी गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने सध्याचे मुख्यालय प्रशस्त व एकसंघ करण्याची संकल्पना महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी मांडली आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी महापालिकांचे मुख्यालय प्रशस्त व देखणे आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेचे मुख्यालय सुद्धा प्रशस्त व आकर्षक करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्याअनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
या प्रस्तावानुसार पालिकेच्या दोन्ही इमारतींच्या पृष्ठभागाला काचेचे आवरण लावले जाणार आहे. तांत्रिकदृष्ट्या दोन्ही इमारतींची रचना एकत्रित केली जाणार आहे. याकरिता सुमारे एक कोटीच्या आसपास खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे भविष्यात पालिकेचे मुख्यालय याठिकाणाहून स्थलांतरित झाले तरी सुद्धा पालिका रु ग्णालय, प्रभाग कार्यालयाचे कामकाज सुंदर व भव्य वास्तूमधून चालवता येणार आहे.
आज होणार निर्णय
सोमवारी पार पडणाºया महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. महासभेच्या मंजुरीनंतर रीतसर टेंडर नोटीस काढून ते मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवले जाणार असल्याची माहिती शहर अभियंते संजय कटेकर यांनी दिली.
एक कोटीचा खर्च : या प्रस्तावानुसार पालिकेच्या दोन्ही इमारतींच्या पृष्ठभागाला काचेचे आवरण लावले जाणार आहे. तांत्रिकदृष्ट्या दोन्ही इमारतींची रचना एकत्रित केली जाणार आहे. याकरिता सुमारे एक कोटीच्या आसपास खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे भविष्यात पालिकेचे मुख्यालय याठिकाणाहून स्थलांतरित झाले तरी सुद्धा पालिका रु ग्णालय, प्रभाग कार्यालयाचे कामकाज सुंदर व भव्य वास्तूमधून चालवता येणार आहे.
पालिकेचे मुख्यालय हे देखणे असावे अशी सर्वांचीच इच्छा असते. पालिकेत भेट देणारे नागरिक देखील याबाबत सूचना करत असतात. त्यादृष्टीने मुख्यालय दोन इमारतीत न विभागता एकत्रित करण्याचा हा प्रस्ताव आहे. यामुळे पालिकेच्या मुख्यालयाला आधुनिक रूप प्राप्त होणार आहे
- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल