- प्रशांत शेडगे, पनवेल
पनवेल महानगरपालिकेबाबत शासकीय यंत्रणाही सकारात्मक आहे. त्याचबरोबर तक्का येथे भव्य प्रशासकीय इमारत बांधण्याचा प्रस्ताव असून याकरिता पनवेल नगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय बैठकीत हिरवा कंदील देण्यात आला आहे. पनवेल नगरपालिका त्याचबरोबर सिडकोच्या विभागीय कार्यालयात प्रभाग कार्यालय थाटण्यात येणार आहे.पनवेल महानगरपालिका झाली तर ती ड वर्ग असेल असे अहवालात नमुद आहे. याकरिता जवळपास साडेबाराशेच्यावर मनुष्यबळ लागणार आहे. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त त्याचबरोबर उप आणि सहाय्यक आयुक्त हे वरिष्ठ अधिकारी असणार आहेच. त्याचबरोबर अभियंत्यांचा भरणाही मोठ्या प्रमाणात असणार आहे. महापालिकेत विविध समितींचा समावेश असेलच त्याचबरोबर सभापतींचा सुध्दा समावेश असेल.एकंदरीत पालिकेपेक्षा महापालिकेचा कारभार अधिक मोठा असेल त्याकरिता प्रशस्त इमारतीची आवश्यकता भासणार आहे. त्या दृष्टिकोनातून अभ्यास करणाऱ्या समितीने कोणत्या ठिकाणी महापालिकेचे मुख्यालय असू शकते याबाबत सर्व्हे केला. त्यानुसार खांदा वसाहतीतील सर्कस मैदान, खारघर येथील काही भूखंडाची चाचपणी करण्यात आली. मात्र हे भूखंड सिडको हस्तांतरित करेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे तक्का येथील पनवेल नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासकीय भवनाचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रशस्त इमारत उभारण्यात यावी तिथे महापालिका आयुक्त व इतर अधिकाऱ्यांकरिता दालन, विविध विभागाकरिता स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, सुविधा केंद्र, सभागृह, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच वाहने उभे करण्याकरिता पार्किंगची व्यवस्था असावी असा उल्लेख अहवालात आहे.तक्का हे ठिकाण मध्यवर्ती असून बाजूलाच पनवेल रेल्वेस्थानक आणि बस आगार आहे. राष्ट्रीय महामार्ग हाकेच्या अंतरावर आहे. त्याशिवाय बाजूलाच गाढी नदीचे पात्र असल्याने अतिशय महत्त्वाचे ठिकाण निवडण्यात आलेले आहे. नागरिकांना प्रशासकीय भवन अतिशय सहजपणे गाठता येईल त्यानुसार तक्का येथे महापालिका भवन उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे. मुख्यालय ठरणार खास आकर्षणप्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलचे स्थान जगाच्या नकाशावर येणार आहे. पनवेलचे महानगरात रूपांतर होणार असल्याने त्या दृष्टीने प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे. इतिहास साक्षीला असलेल्या पनवेल शहरात बंदर, वडाळे तलाव, धूतपापेश्वर औषध निर्मिती कारखाना, चाकजोडी निर्मिती केंद्र, पेठांचे शहर या गोष्टी आहेत. त्याचबरोबर आगामी काळात पनवेलच्या वैभवात आणखी भर पडावी याकरिता भव्य दिव्य आणि आकर्षक स्वरूपाचे महापालिका मुख्यालय उभारण्याची सूचना अहवालात करण्यात आली आहे.