सव्वा लाख नागरिकांची आरोग्य तपासणी; एपीएमसीत १ लाख १५ हजार मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 01:27 AM2020-05-30T01:27:39+5:302020-05-30T01:27:47+5:30
पाच लाख नागरिकांचे तापमान तपासले
- नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने पाचही मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. दोन महिन्यांमध्ये तब्बल १ लाख २७ हजार नागरिकांची तपासणी केली आहे. आतापर्यंत १ लाख १५ हजार नागरिकांना मास्कचे वाटप केले असून ४ लाख ९९ हजार जणांचे तापमान तपासले असून अशा प्रकारे यंत्रणा राबविणारी नवी मुुंबई देशातील एकमेव बाजार समिती ठरली आहे.
मुंबईसह नवी मुंबईमधील दीड कोटी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी बाजार समितीवर आहे. २० मार्चपासून अनेक संकटांना सामोरे जाऊन प्रशासनाने मुंबईकरांना अन्नधान्याचा नियमित पुरवठा करण्यात यश मिळविले आहे. मार्केटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे ११ ते १७ मे दरम्यान सलग सात दिवस पाचही मार्केट बंद ठेवावी लागली होती. पुन्हा अशी स्थिती येऊ नये यासाठी बाजार समिती प्रशासनाने सुरक्षेसाठीच्या उपाययोजना कडक करण्यास सुरुवात केली आहे. दोन महिन्यांपासून प्रत्येक मार्केटनिहाय वेगवेगळी उपाययोजना केली आहे. गर्दी कमी करण्यासाठीही आवक नियंत्रित ठेवली आहे.
ओळखपत्र असल्याशिवाय व मास्क परिधान केल्याशिवाय मार्केटमध्ये प्रवेशच दिला जात नाही. रांग लावण्यासाठी बॅरिकेड तयार केले आहेत. आतमध्ये येणाºया प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली जात आहे. आवक गेटवर वैद्यकीय पथक तैनात केले आहे. प्रत्येकाला हातावर सॅनिटायझर दिले जात आहे. मास्क नसेल तर एपीएमसीच्या वतीने मोफत मास्क उपलब्ध करून दिला जात आहे. थर्मल गनद्वारे तापमान मोजण्यात येत आहे. प्रत्येकाचे पल्स आॅक्सिमीटरद्वारे रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण तपासण्यात येत आहे.
एपीएमसीमध्ये येणाºया प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येत असल्यामुळे जर कोणाची प्रकृती ठीक नसेल तर तत्काळ लक्षात येऊ लागले आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तर तत्काळ त्याचा स्वॅब घेऊन तपासणी केली जात आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर प्रत्येकाला वैद्यकीय तपासणी प्रवेशपत्र दिले जात आहे. मार्केटमध्ये सुरक्षारक्षक व बाजार समितीचे कर्मचारी खरेदीदार व इतरांकडे प्रवेशपत्र आहे का, याचीही तपासणी करत आहेत. जर कोणाकडे पत्र मिळाले नाही तर त्यांच्यावर एक हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे.
देशातील एकमेव बाजार समिती
मार्केटमध्ये येणाºया प्रत्येकाची आरोग्य तपासणी करणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकमेव बाजार समिती आहे. बाजार समिती व्यतिरिक्तही इतर कोणत्याच संस्थेमध्ये प्रत्येकाची नियमित आरोग्य तपासणी केली जात नाही. मास्क व सॅनिटायझरचा पुरवठा, वाहनांचे निर्जंतुकीकरण, मार्केटचे नियमित निर्जंतुकीकरण केले जात आहे. प्रत्येकाचे तापमान व आॅक्सिजन तपासले जात असून अशा प्रकारे उपाययोजना राबविणारी मुंबई बाजार समिती एकमेव संस्था ठरली आहे.
मुंबई, नवी मुंबई व उपनगरांमधील नागरिकांना अन्नधान्याचा नियमित पुरवठा करण्यासाठी बाजार समिती कटिबद्ध आहे. मार्केटमध्ये येणाºया प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. पणन विभागाचे प्रधान सचिव, पणन संचालक व शासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.
- अनिल चव्हाण, सचिव,
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोना योद्धा पुन्हा कर्तव्यावर बाजार समितीमधील सुरक्षा अधिकारी संजय तळेकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीलाही लागण झाली होती. बाजार समिती प्रशासनाने या दोघांच्याही उपचाराची जबाबदारी स्वीकारली होती. दोघेही कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी तळेकर पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. यामुळे बाजार समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. बाजार समिती सचिव अनिल चव्हाण यांनी स्वत: फळ मार्केटमध्ये जाऊन तळेकर यांचे स्वागत केले.
२० मार्चपासून उपलब्ध साहित्य साहित्य संख्या
फेस मास्क १ लाख १५,८४०
हॅन्ड सॅनिटायझर २०६२
फेस स्प्रे ९७
तापमान तपसणी ५ लाख १५ हजार
हॅन्ड ग्लोव्हज ४६४९
फेस शिल्ड १५०
पीपीई किट्स २२