पोलिसांकरिता आरोग्य तपासणी
By admin | Published: January 28, 2017 03:04 AM2017-01-28T03:04:24+5:302017-01-28T03:04:24+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने घणसोली येथे पोलिसांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने घणसोली येथे पोलिसांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी २०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत:च्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
कोपरखैरणे पोलिसांच्या वतीने घणसोली पोलीस चौकीलगतच्या आवारात हे शिबिर भरवण्यात आले होते. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण झाल्यानंतर उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याशिवाय डोळे, दंत व मुख रोगांचीही तपासणी करण्यात आली. बहुतांश पोलिसांना तपासकामामुळे स्वत:च्या आहारावर नियंत्रण ठेवता येत नाही, तर भुकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही जण मिळेल ते पदार्थ खाल्ले जातात. त्याशिवाय मावा, पान यांचेही व्यसन असल्यामुळे दात खराब होवून तोंडाचे आजारही होण्याची शक्यता असते. काहींना धूळ अथवा धुराच्या त्रासामुळे डोळ्यांचे आजार होवून त्यांच्या दृष्टीवर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. परिणामी अनेक पोलिसांना उतारवयात प्रकृतीच्या अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. याची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी हे शिबिर भरवले होते. याप्रसंगी डॉ. राहुल ढाणे, डॉ. प्रशांत थोरात यांच्या वैद्यकीय पथकाने पोलिसांची मोफत तपासणी केली. दरम्यान, वर्षभरात विशेष कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलिसांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)