आरोग्य विभागाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 11:48 PM2018-12-01T23:48:24+5:302018-12-01T23:48:38+5:30
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. औषध फवारणी वेळेवर केली जात नाही.
नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. औषध फवारणी वेळेवर केली जात नाही. ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा शहरवासीयांना फटका बसत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून, ठेकेदारावर कारवाई करून नवीन निविदा काढाव्यात, अशी मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केली आहे.
डासांची समस्या गंभीर झाली आहे. त्रस्त झालेले नागरिक नगरसेवकांकडे तक्रारी करू लागले आहेत. नगरसेवक ठेकेदार व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून औषध व धूर फवारणीमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत; परंतु ठेकेदारांकडून समाधानकारक कामे केली जात नाहीत. औषध पुरेशा प्रमाणात फवारले जात नाही. अनेक दिवसांपासून औषध तुटवडा निर्माण झाला असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. या तक्रारींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे; पण प्रशासनही ठेकेदाराला पाठीशी घालत असल्यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये अधिकाºयांना धारेवर धरले. औषध फवारणीसाठी कोणती औषधे वापरली जातात, घरामध्ये व घराच्या बाहेर कोणती औषध फवारणी करायची असते, याचा तपशील देण्यात यावा. डास मारण्यासाठीच्या औषधांची गुणवत्ता नियमित तपासली जाते का? याचीही चौकशी करणे गरजेचे आहे. यापूर्वी महानगरपालिका औषध विकत घेऊन ते ठेकेदारांना पुरवत होते; परंतु नवीन निविदा काढल्यानंतर औषध खरेदीची जबाबदारीही ठेकेदारावर सोपवली आहे. ठेकेदार औषधांच्या ऐवजी डिझेलचा धूर सर्वत्र सोडत असल्याची टीकाही नगरसेवकांनी सभेत केली. नागरिक त्रस्त झाले असताना अधिकारी व ठेकेदार मात्र निवांत आहेत. डासांचे प्रमाण नियंत्रणामध्ये आणता येत नसेल व हिवाळ्यात डासांच्या प्रमाणात वाढ होतेच, असा प्रशासनाचा दावा असेल तर मग औषध फवारणीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च का व्यर्थ घालवला जात आहे, अशी टीकाही करण्यात आली.
महापालिका मलेरिया व डेंग्यूचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. याशिवाय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळ करणाºया ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. ठेका रद्द करून नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे. आरोग्य अधिकारी दयानंद कटके यांनी या विषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हिवाळ्यात प्रत्येक वर्षी डासांचे प्रमाण वाढत असते. पालिकेच्या वतीने उपाययोजना केल्या जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनी डासांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी आल्या असल्याची माहिती दिली. औषधे खरेदीची जबाबदारी ठेकेदारावर का देण्यात आली व या विषयीची माहिती पुढील सभेत देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
।औषधांऐवजी डिझेलचा धूर केला जात असण्याची शक्यता
औषधे बदलण्याची आवश्यकता
ठेकेदाराची पात्रता तपासणे गरजेचे असल्याचे मत
अधिकारी, ठेकेदारांची मिलीभगत असल्याचा आरोप
>डास नियंत्रणासाठी वापरण्यात येणाºया औषधांची गुणवत्ता कोठे तपासली जाते. औषधांऐवजी डिझेलचा धूर केला जात असण्याची शक्यता असून याची चौकशी करण्यात यावी.
- देविदास हांडे-पाटील,
नगरसेवक, प्रभाग ४२
शहरात औषध फवारणी केली जाते; परंतु त्याचा डासांवर काहीही परिणाम होताना दिसत नाही, औषधे बदलण्याची आवश्यकता आहे.
- डॉ. जयाजी नाथ,
नगरसेवक, प्रभाग १०४
>ज्या ठेकेदाराला काम दिले त्याची पात्रता तपासणे गरजेचे आहे. या विषयी निविदा कधी काढल्या हेही आठवत नाही. आयुक्तांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुन्हा निविदा काढाव्या व या कामात भागीदार कोण आहेत, याचाही शोध घ्यावा.
- नामदेव भगत,
नगरसेवक, प्रभाग ९३
शहरात डासांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून, या समस्येकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांना खुर्चीत बसण्याचा अधिकार आहे का? फवारणी करण्यात आलेल्या औषधांचा तपासणी अहवाल सादर करावा.
- दिव्या गायकवाड,
नगरसेविका, प्रभाग ६४