तुर्भे हनुमाननगरमध्ये तुंबलेल्या गटारामुळे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 11:35 PM2020-09-28T23:35:03+5:302020-09-28T23:35:31+5:30
घाणीचे साम्राज्य : स्वच्छता अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष
नवी मुंबई : केवळ शहरात आणि राज्यात नव्हे, तर संपूर्ण देशात स्वच्छतेचे शहर म्हणून तिसरा क्रमांक मिळविणारी नवी मुंबई महापालिका आहे. मात्र, या स्मार्ट सिटीत तुर्भे परिसरातील हनुमाननगरची पार दुरवस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे साचले आहेत. संपूर्ण कचरा रस्त्यावर येऊनही तुर्भे विभागाच्या स्वच्छता अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना नाक-तोंड दाबून घाणीच्या साम्राज्यातून जावे लागत आहे. त्यामुळे स्वच्छता विभागाचे तीनतेरा वाजले आहेत. विद्युत केबलची गंभीर समस्या असल्याने, नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तुर्भे नाका येथील हनुमाननगरमधील अनेक ठिकाणी उघडी गटारे असल्यामुळे, या गटारातील दूषित सांडपाणी अनेकदा नागरिकांच्या घरात शिरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. गटारांची वेळच्या वेळी साफसफाई होत नसल्याने, डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण खोपडे यांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही या प्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली नसल्याचे खोपडे यांनी सांगितले. विद्युत खांबावरील उघड्या विजेच्या तारांनी अक्षरश: झाडांच्या वेलींप्रमाणे विळखा घातलेला आहे. त्यामुळे रहिवाशांना रात्री अपरात्री जीव मुठीत धरून येथून चालावे लागते.
पालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे झोपडपट्टी परिसर म्हणजे अत्यंत दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य. अनेक ठिकाणी गवत वाढलेले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत देशात तिसरा क्रमांक पटकावलेल्या या महापालिकेच्या संबंधित अधिकाºयांनी प्रत्यक्षात या नगरची पाहणी केल्यास स्वच्छता विभागाचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. कचराकुंडी भरून कचरा बाहेर पडूनही उचलण्यात आला नसल्याची तक्रार असून, या कुंडीबाहेर मेलेली कुत्री आणि डुकरांचा वावर दिसून येत आहे. येथील नियोजित उद्यानाच्या मोकळ्या भूखंडासमोर अक्षरश: कचºयाचे डम्पिंग झाले आहे. त्यामुळे या परिसराची दयनीय अवस्था झाली आहे.
तुर्भे परिसरातील हनुमाननगरात कचरा, दूषित सांडपाणी, गटारे याबाबत त्वरित पाहणी करण्यात येईल. त्या संदर्भात संबंधित अधिकाºयांना सूचित करण्यात येईल आणि कचरा उचलून साफसफाई करण्यात येईल.
- डॉ.बाबासाहेब राजळे,
उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, मुख्यालय