आरोग्य धोक्यात : घणसोलीत नळाद्वारे दूषित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 02:25 AM2019-01-12T02:25:30+5:302019-01-12T02:25:45+5:30
आरोग्य धोक्यात : पाण्यातून किडे आल्याने नागरिक संतप्त
नवी मुंबई : गेल्या एक ते दीड महिन्यांपासून घणसोलीत गावदेवी वाडी परिसरातील २०० पेक्षा अधिक नागरिकांना नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाण्यातून जंतू, किडे येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातील अनेकजण ताप, सर्दी, पोटदुखीसारख्या आजाराने ग्रस्त आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने गावदेवी वाडीत पाणीपुरवठा होतो. शुक्रवारी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत महापालिका प्रशासनाचा निषेध केला. पाणीपुरवठा विभागाने नवीन जलवाहिनी टाकली आहे, त्यासाठी खोदलेला खड्डा बुजवलेला नाही. एकीकडे पाणीटंचाई तर दुसरीकडे महापालिकेकडून येणारे पाणी दूषित असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे गावदेवी वाडीतील १५ पेक्षा जास्त व्यक्ती विविध आजाराने ग्रस्त आहेत. उघड्या गटारालगत असलेल्या जलवाहिनीला गळती असल्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले.
महापालिकेकडून मुख्य जलवाहिनीतून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा होतो. मात्र, काही रहिवाशांनी नळ कनेक्शन गटारातून घेतले आहेत, त्यामुळे पाणी दूषित झाले असून याबाबत शोध घेतला जाईल, असे आश्वासन महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल नेरपगार यांनी दिले.