जुईनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात
By admin | Published: April 4, 2016 02:17 AM2016-04-04T02:17:46+5:302016-04-04T02:17:46+5:30
रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेल्वे कॉलनीमधील कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी असणारे रुग्णालयही बंद अवस्थेत आहे
नामदेव मोरे, नवी मुंबई
रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेल्वे कॉलनीमधील कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी असणारे रुग्णालयही बंद अवस्थेत आहे. उघडी गटारे, साचलेले पाणी, बंद इमारतींमधील घाणीचे साम्राज्यामुळे पूर्ण जुईनगर परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ पसरू लागली असून, परिसरातील रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
सर्वाधिक घाणीचे साम्राज्य असणारी वसाहत म्हणून जुईनगर सेक्टर २२ मधील रेल्वे कॉलनीकडे पाहिले जाऊ लागले आहे. मध्ये रेल्वे प्रशासनाने १९९५ मध्ये कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी वसाहत उभी केली आहे. परंतु योग्य देखभाल न केल्यामुळे वसाहतीला समस्यांचा विळखा पडला आहे. अधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेल्या इमारतीच्या परिसरात साफसफाई केली जात आहे. परंतु कर्मचाऱ्यांसाठीच्या इमारतीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. उघड्या गटारांमुळे व साठलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. सांडपाण्यासाठीच्या गटारावर व सेप्टिक टँकवर झाकणे नसल्याने तेथेही डासांची उत्पत्ती होत आहे. मोडकळीस आलेल्या व अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये कचरा टाकला जात आहे. यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे. सिव्हरेज लाइनमधील मल व पाणी परिसरात पसरत आहे. इमारतीजवळून जाताना नाक मुठीत धरावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने येथील देखभाल व दुरुस्ती व साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यामुळे वर्षभर वारंवार डेंग्यू, मलेरियाची साथ पसरत आहे. पावसाळ्यात प्रत्येक घरामध्ये तापाचे रुग्ण आढळत आहेत. लहान मुलांना वर्षभर सातत्याने वेगवेगळे आजार होत आहेत. कॉलनीमधील कचऱ्यामुळे येथील कर्मचारी व त्यांच्या कुटुंंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहेच, त्याचबरोबर परिसरातील सिडको नोडवासीयांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. वारंवार साथ पसरू लागल्यामुळे रेल्वे प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे.
रेल्वेने या ठिकाणी वसाहत उभी केल्यानंतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी २० बेड क्षमतेचे स्वतंत्र रुग्णालय बांधले आहे. ५ जानेवारी १९९८ मध्ये मध्य रेल्वेचे तत्कालीन महाप्रबंधक श्री. के. बालाकेसरी यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु काही दिवसांमध्येच हे रुग्णालय बंद करण्यात आले. सद्य:स्थितीमध्ये कधी तरी एक डॉक्टर या ठिकाणी येत असतात. डॉक्टर कधी येतात व कधी जातात, हेही रहिवाशांना कळत नाही. आंतररुग्ण विभाग बंदच आहे. फक्त दाखविण्यासाठी काही बेड ठेवण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना सर्दी, डोकेदुखी व इतर किरकोळ आजारांवरच उपचार होत असतात. डॉक्टर येण्याची वाट पाहण्यापेक्षा कर्मचारी खासगी रुग्णालयात जाण्यास पसंती देत आहेत. १ एप्रिलला रेल्वे वसाहतीमध्ये सेप्टिक टँकमध्ये पडल्याने महिलेचा पाय मोडला. सदर महिलेवर प्राथमिक उपचार करण्याचीही सुविधा नव्हती. रुग्णालय सुरूच करायचे नव्हते तर इमारत बांधण्यावर लाखो रुपये खर्च का केले, असा प्रश्न रहिवासी उपस्थित करीत आहेत.