प्रशांत शेडगे , पनवेलजगातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था नवी मुंबईमध्ये असल्याचा दावा सिडकोने केला आहे. सिडको क्षेत्रामध्ये तब्बल १७६ हॉस्पिटल्स व १,१७७ खासगी क्लिनिक असल्याचे सांगितले जात असून, पाच नवीन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स बांधली जाणार आहेत. कागदावर आरोग्य यंत्रणा बळकट असली तरी प्रत्यक्षात प्रस्तावित स्मार्ट दक्षिण नवी मुुंबईमधील नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सुविधा मिळत नाहीत. खासगी रुग्णालयांमधील उपचार परवडत नाहीत व शासकीय रुग्णालयेच नसल्याने पनवेल तालुक्यातील नागरिकांना नवी मुंबई व मुंबई पालिकेच्या रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा सिडकोने केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मार्ट सिटी उभारण्याच्या कामाचा शुभारंभ झाला. पनवेल व उरण तालुक्यामधील सिडकोचे कार्यक्षेत्रामध्ये सर्वोत्तम नागरी सुविधा दिल्या जाणार असल्याचा दावा केला आहे. सिडकोने पूर्ण नवी मुंबईमध्ये एकूण १७६ हॉस्पिटल, ११७७ खासगी क्लिनिक, ८७ पॅथॉलॉजी लॅब असल्याचा दावा केला आहे. सर्व हॉस्पिटल्समध्ये मिळून ६,०३६ बेड्सची क्षमता आहे. जगातील सर्व देशांपेक्षा प्रती हजार लोकसंख्येमागे सर्वाधिक बेडसंख्या या परिसरात आहे. वास्तव वेगळे आहे. पनवेल शहरासह पूर्ण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अद्याप जि. परिषदेच्या भरवशावर आहे. जिल्हा परिषदेचे आपटे, वावंजे, नेरे, अजिवली, गव्हाणमध्ये एकूण पाच नागरी आरोग्य केंद्रे व ३२ उपकेंद्रे आहेत. शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे. परंतु ही सर्व यंत्रणा फक्त कागदावर व प्राथमिक उपचार करण्यापुरतीच मर्यादित आहे. आरोग्य विभागासाठी १६६ पदे मंजूर आहेत, परंतु त्यामधील २५ पदे रिक्त आहेत. १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामधील पाच जण उच्च शिक्षणासाठी दीर्घ मुदतीच्या सुटीवर आहेत. १४ वर्षे झाल्यानंतरही रुग्णालयाचे काम अपूर्ण आहे.पनवेलमधील ग्रामीण रुग्णालयाचे काम २००१ मध्ये सुरू करण्यात आले. सुरुवातीला ३० बेड्सचे रुग्णालय बांधले जाणार होते, परंतु नंतर ही संख्या १२० पर्यंत नेण्यात आली. शासनाकडून वेळेत निधी न मिळाल्यामुळे जवळपास १४ वर्षे झाल्यानंतरही अद्याप रुग्णालये सुरू झाली नाहीत.
आरोग्य यंत्रणा कोलमडली
By admin | Published: April 07, 2016 1:20 AM