नवी मुंबई : सानपाडा दत्त मंदिरच्या मागील बाजूला रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी असलेल्या भूखंडावर डेब्रिजचे डंपिंग ग्राऊंड तयार झाले आहे. रोज अनधिकृतपणे शेकडो डंपर खाली करून भराव केला जात आहे. यामुळे रेल्वे ट्रॅकची सुरक्षाही धोक्यात आली असून या अतिक्रमणाकडे पालिका, रेल्वे व सिडको प्रशासन दुर्लक्ष करत आहे. नवी मुंबईमध्ये डेब्रिजचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होवू लागला आहे. एमआयडीसी, ठाणे बेलापूर रोड,महामार्गासह जागा मिळेल त्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रिज टाकले जात आहे. मुंबई व ठाण्यामधील बांधकामाचा कचराही नवी मुंबईत आणला जात आहे. डेब्रिज माफियांना रोखण्यासाठी पालिकेने विशेष पथक तयार केले आहे. पण डेब्रिजचे अतिक्रमण रोखण्यामध्ये या पथकाला अपयश आले आहे. ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावर सानपाडा दत्तमंदिरजवळ ट्रॅकच्या मध्यभागी विस्तीर्ण भूखंड आहे. या भूखंडावर डेब्रिजचा भराव सुरू झाला आहे. दिवसभर १०० पेक्षा जास्त डंपर खाली झाले आहेत. बिनधास्तपणे सुरू असलेल्या या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. डेब्रिजचा भराव मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. आतापर्यंत ८ ते १० फुटांचा थर तयार झाला आहे. हजारो डंपर खाली केल्यानंतरही अद्याप कोणावरच कारवाई झालेली नाही. राजकीय व प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभय मिळत असल्याने हा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात असून कारवाई कधी करण्यात येणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याविषयी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडेही तक्रार केली जाणार आहे.
रेल्वे रुळालगत डेब्रिजचे ढीग
By admin | Published: February 20, 2017 6:30 AM