मोकळ्या भूखंडावर कचरा, डेब्रिजचे ढीग; गवत वाढल्याने रहिवाशी त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 01:05 AM2019-12-10T01:05:00+5:302019-12-10T01:05:16+5:30
सर्पदंश, विंचूदंशाच्या घटना; डासांचा प्रादुर्भावामुळे आरोग्य धोक्यात
कळंबोली : कळंबोली वसाहत, रोडपाली परिसरातील अनेक भूखंड अद्याप मोकळे आहेत. तर काही आरक्षित असल्याने रिकामे आहेत. याठिकाणी झाडेझुडपे ,गवत वाढल्याने जंगलाचे स्वरूप आले आहे. सरपटणाऱ्या प्राणांचा वावर वाढल्याने आजूबाजूच्या सोसायट्यांना त्रास होऊ लागला आहे. याबाबत महापालिका आणि सिडकोने लक्ष देवून योग्य ती कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
कळंबोलीत रोडपाली परिसरात नवीन सेक्टर विकसीत झाले आहेत. साडेबारा टक्के योजनेतील या भूखंडावर खारघरप्रमाणेच उंच उंच इमारती बांधण्यात आल्या असून हजारो नागरिकांचे वास्तव्य आहे. मात्र परिसरातील काही भूखंड आजही मोकळे असल्याने याठिकाणी झाडेझुडपे, गवत वाढले आहे. सेक्टर २० मध्ये अरिहंत श्रेयन्स, भूमी गार्डेनिया २ जवळील भूखंड रिकामा असल्याने एक प्रकारे जंगलच तयार झाले असून साप, विंचू, घुशी यांचा वावर वाढला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरिया, संसर्गजन्य आजारही बळावत आहेत.
सिडकोकडून परिसरात रस्ता बांधण्यात आला आहे. मात्र शॉर्टकटसाठी बहुतांश रहिवाशी मोकळ्या भूखंडावरून ये-जा करतात. सेक्टर १७ मधील ३७ क्रमांकाच्या भूखंडावर एक इमारत बांधण्यात आली आहे. तिच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवरही जंगल तयार झाले आहे. याच सेक्टरमध्ये शगुन रेसिडेन्सी प्लॉट क्रमांक २२ वर आहे. या गृहसंकुलाला लागून असलेला भूखंडावरही गवत वाढले आहे. अलक व्हिक्टोरिया पार्कजवळही अशीच परिस्थिती आहे. सेक्टर १० येथे काही प्लॉट बिल्डर्स करून अद्याप विकसीत करण्यात आलेले नाही. याठिकाणीही झाडी-झुडपे वाढली आहेत. शिवाय डेब्रिज, कचरा टाकला जात असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढतो. शिवाय दुर्गंधीही पसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सिडको व महापालिकेने संबंधीत जागा मालक, बिल्डरला सूचना द्याव्यात, अशी मागणी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी केली.
सीईटीपी प्लान्टला वेढा
रोडपाली तलावाच्या बाजूला, तसेच कामोठे सिग्नलकडे जाणाºया रस्त्याच्या बाजूलाच ५२ एमएलडी क्षमतेचा सिडकोचा सीईटीपी प्लान्ट आहे. या ठिकाणीही झाडे वाढल्याने परिसरात भयाण शांतता असते.
कळंबोली, तसेच रोडपाली परिसरातील मोकळ्या भूखंडाची पाहणी करून तेथील गवत काढण्यात येईल. या भूखंडावर नियमित साफसफाईही केली जाईल.
- मिलिंद म्हात्रे, कार्यकारी अभियंता, कळंबोली सिडको
फुटपाथवरही झाडे, झुडपे व गवत
सेक्टर २० येथे मोनाराज हा बिल्डिंग प्रकल्पाचे प्रकरण न्यायालयात दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. या ठिकाणी उच्च न्यायालयाने काम करण्यास स्थगिती दिल्याचा सूचना फलक लावला आहे. या ठिकाणचे काम अपूर्ण असून न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडले आहे. येथील पदपथावरही गवत, झाडे वाढल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होते.