रस्त्यांवर झेंडूच्या फुलांचे ढीग; शेतकरी राहिला उपाशी, भाव घसरल्याने नुकसान
By नामदेव मोरे | Published: October 25, 2023 09:50 AM2023-10-25T09:50:16+5:302023-10-25T09:52:14+5:30
शिल्लक फुले फेकून देण्याची वेळ
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कुटुंबीयांसोबत आपण दसऱ्याचा आनंद घेत असताना फूल उत्पादक शेतकऱ्यांना मात्र दोन दिवस पदपथावर मुक्काम करावा लागला. यावर्षी भाव घसरल्यामुळे तसेच ऑक्टोबर हीटचा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. उत्पादन जास्त व ग्राहक कमी असल्यामुळे शिल्लक फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याचे चित्र मंगळवारी नवी मुंबईतील विविध रस्त्यांवर दिसले.
घर, दुकान व वाहनांवर दसऱ्याच्या दिवशी फुलांचे तोरण लागावे यासाठी शेतकरी तीन महिने शेतात दिवसरात्र कष्ट घेतात.
पूर्वी मुंबईमधील फूल मार्केट व किरकोळ विक्रेत्यांना फुलांची विक्री केली जायची; पण उत्सव काळात भाव घसरत असल्यामुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागते. यामुळे पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, घोडेगाव या परिसरातील शेतकऱ्यांनी स्वत:च फुलांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
प्रत्येक वर्षी १०० ते १५० शेतकरी नवी मुंबईमधील वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सानपाडा, नेरूळ व इतर ठिकाणी पदपथ व मार्केट परिसरात फूलविक्रीचा व्यवसाय करतात.
ऑक्टोबर हीटचाही बसला फटका
यावर्षी नवी मुंबईत ठिकठिकाणी शेतकरी बाजार भरला होता. रविवारी सायंकाळीच शेतकऱ्यांनी येथे हजेरी लावली होती. प्रत्येक शेतकऱ्याने ३०० ते ५०० किलो फुले आणली होती. गतवर्षी दसऱ्याला १५० ते २०० रुपये किलो असा झेंडूला भाव मिळाला होता. यावर्षी उत्पादन जास्त असल्यामुळे भाव कोसळून ५० ते ८० रुपये किलो झाले आहेत. उन्हामुळे फुले लवकर सुकत होती.
दसऱ्याला झेंडूच्या फुलांना मागणी असल्यामुळे प्रत्येक वर्षी फुलांची विक्री करण्यासाठी नवी मुंबईमध्ये येत असतो. यावर्षी फुलांचे दर घसरले. उन्हामुळेही विक्रीवर परिणाम झाला. अपेक्षित लाभ झाला नाही. शिल्लक माल फेकून द्यावा लागल्यामुळे नुकसान सहन करावे लागले. - बाळू टोके, शेतकरी, पुणे
व्यापाऱ्यांना फुले देण्यापेक्षा स्वत: विक्री केल्यास अधिक फायदा होतो. यामुळे प्रत्येक वर्षी दसरा व दिवाळीला नवी मुंबईमध्ये येतो. यावर्षी भाव कमी झाल्याने अपेक्षित फायदा झाला नाही. - अरुणा बारवे, शेतकरी, घोडेगाव, जि. पुणे