अलिबाग, उरणमधील विविध पाच खटल्यांची सुनावणी

By admin | Published: September 9, 2016 03:14 AM2016-09-09T03:14:47+5:302016-09-09T03:14:47+5:30

अलिबाग व उरण तालुक्यातील वेगवेगळया पाच खटल्यांमध्ये येथील सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अपीलांच्या सुनावणी अंती १० आरोपींची शिक्षा न्यायालयाने कायम केली आहे.

Hearing of five different cases in Alibaug, Uran | अलिबाग, उरणमधील विविध पाच खटल्यांची सुनावणी

अलिबाग, उरणमधील विविध पाच खटल्यांची सुनावणी

Next

अलिबाग : अलिबाग व उरण तालुक्यातील वेगवेगळया पाच खटल्यांमध्ये येथील सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अपीलांच्या सुनावणी अंती १० आरोपींची शिक्षा न्यायालयाने कायम केली आहे.
अलिबाग तालुक्यातील एका अपील प्रकरणातील कुर्डूस येथील आरोपी प्रशांत हिराचंद पाटील याला, घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. त्याला तीन महिने कैद व १ हजार ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयातील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मुकुंद सेवलीकर यांच्या न्यायालयात झाली.
अलिबागमधील नवखार येथील रणधीर सुरेश पाटील, मच्छिंद्र शंकर भगत, प्रकाश सीताराम पाटील, चिंतामण हरी पाटील, विलास शंकर भगत आणि केसरीनाथ नाना भगत या सहा आरोपींनी बेकायदा मंडळी जमवून साक्षीदारांना दुखापत केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. या आरोपींना जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दिलेली शिक्षा सत्र न्यायालयाने कायम केली आहे. या सर्व सहा आरोपींना सहा महिने तुरुंगवास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा भोगावी लागणार आहे. ही घटना १६ डिसेंबर २००१ रोजी घडली होती. या घटनेची फिर्याद बेलपाडा येथील रामकृष्ण म्हात्रे यांनी दिली होती.
उरण तालुक्यातील डोंगरी येथील रूपेश घरत याने त्यास लागू असलेला तडीपारीचा आदेश मोडून उरण तालुक्यातील डोंगरी येथील आपल्या घरी प्रवेश केल्याप्रकरणी उरण न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्याला सहा महिन्यांची सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. आरोपीने या शिक्षेस आव्हान दिले होते. मात्र, सत्र न्यायालयाने अपीलामध्ये याच शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. आरोपी रूपेश भालचंद्र घरत याला पोलीस उपायुक्तांनी २६ डिसेंबर २००८ रोजी आदेश देऊन ठाणे, रायगड, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांतून दोन वर्षांकरिता हद्दपार केले होते. रूपेश घरत २५ नोव्हेंबर २००९ रोजी डोंगरी येथे सापडल्याने त्यांच्यावर हा खटला पोलिसांनी दाखल केला होता.
उरणमधील पागोटे येथील माजी उपसरपंच धर्मेंद्र पाटील याला दोषी ठरवत, त्याला प्रत्येक कलमाखाली तीन महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड अशी शिक्षा दिली. आरोपी धर्मेंद्र पाटील याच्या घराजवळील स्पीडब्रेकर फिर्यादींनी तोडले. याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादींच्या घरात घुसून प्रदीप गोसावी पाटील, साक्षीदार गौरुबाई व जयश्री यांनादेखील मारहाण केली होती.

Web Title: Hearing of five different cases in Alibaug, Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.