विकास आराखड्यावरील १५८९० हरकतींवर सुनावणी सुरू
By नामदेव मोरे | Published: March 14, 2023 06:06 PM2023-03-14T18:06:51+5:302023-03-14T18:07:35+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेचा २०१८ ते २०३८ पर्यंतचा विकास आराखडा तयार करण्यासाठीची कार्यवाही सुरू आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यावर नागरिकांनी दाखल केलेल्या १५८९० सूचना व हरकतींवर मंगळवारपासून प्रत्यक्षात सुनावणी सुरू झाली आहे. २९ मार्चपर्यंत सुनावणी सुरू राहणार असून प्रत्येक हरकतदारांना सुनावणीसाठी कधी उपस्थित रहावे यासाठीचे वेळापत्रक पाठविण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचा २०१८ ते २०३८ पर्यंतचा विकास आराखडा तयार करण्यासाठीची कार्यवाही सुरू आहे. महानगरपालिकेने तयार केलेल्या प्रारूप आराखड्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२२ मध्ये सूचना व हरकती मागविल्या होत्या. नागरिकांनी १५८९० हरकती दाखल केल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी नियोजन समिती तयार केली आहे. या समितीमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, महाराष्ट्र शासनाच्या नगररचना विभागाचे सेवानिवृत्त संचालक सुधाकर नांगणुरे, सेवानिवृत्त सहसंचालक प्रकाश भुकटे, वास्तुविशारद तथा पर्यावरण तज्ञ निता पाकधने, अभियंता तथा व्हिजेटीआयचे विभाग प्रमुख केशव सांगळे यांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी महानगरपालिका मुख्यालयामध्ये सुनावणी सुरू झाली. यावेळी मनपाच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण यांनी सुनावणी कशी होणार याविषयी माहिती दिली.
नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारींवर त्यांचे म्हणने २९ मार्चपर्यंत ऐकूण घेतले जाणार आहे. सर्व तक्रारदारांना वेळापत्रक पाठविण्यात आले असून त्या वेळेत सुनावणीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अनेक हरकती बोगस
विकास आराखड्यावर शेवटच्या टप्यात अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हरकती दाखल केल्या होत्या. यामधील अनेक नागरिकांना त्यांनी हरकत दाखल केली आहे याविषयी माहितीच नाही. पहिल्याच दिवशी टाटा नगर झोपडपट्टीमधून आलेल्या नागरिकांनी आम्हाला घर मिळणार असल्यामुळे आम्ही आलो असल्याचे सांगितले. यामुळे सुनावणीदरम्यान अनेक हरकती बोगस व तथ्यहिन निघण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.