मीरारोड - जन्मतः हृदयाचे ठोके बंद पडलेल्या आणि श्वासोच्छावासाचा त्रास असलेल्या एका नवजात बाळाचे प्राण वाचवण्यात मीरारोड येथील एका खाजगी रूग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे. नवजात शिशु तज्ञ डॉ. वीरेंद्र वर्मा यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने मृत पेशी आणि मेंदूचे नुकसान कमी करण्यासाठी हायपोथर्मिया उपचारासह अभिनव व्यवस्थापनाच्या सहाय्याने नवजात शिशुच्या हदयाचे ठोके पुर्ववत केले .
रुग्णालयाने दिलेल्या माहिती नुसार, ३.५ किलो वजनाच्या पूर्ण-मुदतीच्या बाळाला आपत्कालीन परिस्थितीत मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयाच्या एनआयसीयु त दाखल करण्यात आले. जन्मावेळी बाळाच्या हृदयाचे ठोके आणि श्वसनप्रक्रिया सामान्यरित्या होत नसल्याने जन्मल्यानंतर अवघ्या २५ मिनिटांतच बाळाच्या –हदयाचे ठोके व श्वासोच्छवास सुरळीत करण्यात येथील डाँक्टरांच्या चमूला यश आले.
नवजात शिशू तज्ञ डॉ. वीरेंद्र वर्मा सांगतात की, “आम्ही या बाळावर हायपोथर्मियाची पद्धत अवलंबविण्याचा प्रयत्न केला तत्पुर्वी त्याचे फायदे आणि दुष्परिणाम याविषयीची माहिती बाळाच्या पालकांना सांगून या उपचाराचा निर्णय घेण्यात आला. उपचारात्मक हायपोथर्मिया उपचारामध्ये बाळाला मानवी शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा ३ ते ४ अंश सेंटीग्रेड कमी तापमानात ठेवले जाते ज्यामुळे मेंदूमधील इजा कमी होण्यास मदत होते. या प्रक्रियेत ७२ तासांपर्यंत उपचारात्मक हायपोथर्मिया दिला जातो. रुग्णालयात पोहोचल्यानंतर १० मिनिटांच्या आत मुलाला काही विशेष औषध देण्यात आले. त्यानंतर बाळाच्या हृदयाचे ठोके पडायला लागले. आता बाळाची प्रकृती उत्तम असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
डॉ वीरेंद्र म्हणाले, ही पद्धत तापमान कमी करते आणि त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता आणि मुक्त रॅडिकल्सची निर्मिती कमी करण्यास मदत होते. जेव्हा ऑक्सिजन, ग्लुकोज आणि रक्ताची गरज कमी होते, तेव्हा मेंदूतील चेतापेशींचे संरक्षण होते. उपचारात्मक हायपोथर्मिया केवळ पूर्ण कालावधीत आणि चांगल्या वजनाच्या बाळांमध्येच केले जाऊ शकते जे जन्मल्यानंतर ६ तासांच्या आत रुग्णालयात पोहोचतात. मॅग्नेशियम सल्फेट, अॅलोप्युरिनॉल इत्यादी इतर न्यूरोप्रोटेक्टिव्ह थेरपी देखील दिल्या जाऊ शकतात. हायपोक्सिक इस्केमिक एन्सेफॅलोपॅथीमुळे सेरेब्रल पाल्सी होऊ शकते. परंतु, वेळीच उपचार झाल्याने या बाळाचे प्राण वाचवता आले.
मुलीचे वडील म्हणाले की, “जन्मानंतर मुलीच्या हृदयाचे ठोके योग्यपद्धतीने सुरू नव्हते. तिला श्वसनाचा त्रास होत होता. हे पाहून आम्ही घाबरून गेलो होतो. परंतु, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे माझ्या मुलीला नवीन आयुष्य मिळाले आहे. सामान्यतः जी बाळं जन्माच्या वेळी रडत नाहीत त्यांना हायपोक्सिक इस्केमिक एन्सेफॅलोपॅथी म्हणतात. एचआयई श्रेणी १ मध्ये जवळजवळ १०० टक्के बाळं जगली आहेत आणि जवळजवळ १०० टक्केचे न्यूरोलॉजिकल परिणाम चांगले आहेत. एचआयई श्रेणी २ मध्ये ७० टक्के बाळांना न्यूरोलॉजिकल कमतरता नसते आणि ३० टक्के बाळांना सेरेब्रल पाल्सी हा आजार होतो, जो अपंगत्व किंवा मतिमंदता किंवा दोन्ही द्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. एचआयई श्रेणी ३ मध्ये ५० टक्के मुलं दगावतात . आणि उर्वरित ५० टक्के मुलांमध्ये सेरेब्रल पाल्सी विकसित होतात. रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झालेले हे बाळ एचआयई श्रेणी २ किंवा ३ मधील असल्याचे दिसून येते.