हृदयरोगतज्ज्ञ ठरतोय प्रेरणास्रोत
By admin | Published: January 19, 2016 02:24 AM2016-01-19T02:24:12+5:302016-01-19T02:24:12+5:30
: जिल्हा परिषदेच्या शाळेत व दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या डॉ. सोमनाथ मल्लकमीर यांनी कॉर्डिओलॉजीमध्ये पीएच.डी मिळविली आहे.
नवी मुंबई : जिल्हा परिषदेच्या शाळेत व दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या डॉ. सोमनाथ मल्लकमीर यांनी कॉर्डिओलॉजीमध्ये पीएच.डी मिळविली आहे. अल्पावधीमध्ये हृदयरोगतज्ज्ञ म्हणून लौकिक मिळविलेले डॉक्टर उत्तम अॅथलीटही आहेत. त्यांचे यश महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू लागले आहे.
इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेतले तरच भविष्यात प्रगती करता येते असा गैरसमज समाजामध्ये पसरू लागला आहे. यामुळे आर्थिक स्थिती चांगली नसतानाही अनेक पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठवू लागले आहेत. शहरांमध्ये महापालिकेच्या व खेडेगावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. अशा स्थितीमध्ये डॉ. सोमनाथ मल्लकमीर यांचे यश सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यामधील मेढा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षणही गावातील श्री वेण्णा विद्या मंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेतच पूर्ण केले. यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएस व एमडीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जवळपास एक दशकापासून नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये कार्यरत आहेत.
रुग्णालयामध्ये सुरवातीस जनरल प्रॅक्टीशनर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी हृदयविकार विभागावर लक्ष केंद्रित केले. या विषयावरील पीएच.डी नुकतीच पूर्ण केली आहे. या यशानिमित्त त्यांच्या १९९० मधील दहावीमधील सहकाऱ्यांनी मूळ गावी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. हृदयरोग तज्ज्ञाचे विचार ऐकण्यासाठी हजारो विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.
मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील ५० विद्यार्थ्यांवर डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रिया करणाऱ्या या टीममध्ये डॉ. सोमनाथ यांचेही महत्त्वाचे योगदान आहे. अनेक गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यामध्ये त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांनी अल्पावधीत मिळविलेले यश ग्रामीण भागामधील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरू लागले आहे. यश मिळविण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या व खाजगी शाळांमध्येच शिक्षण घ्यावे लागते हा समज सर्वत्र पसरू लागला आहे. यश मिळविण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या आग्रहाची गरज नाही. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व शहरांमध्ये महानगरपालिका, नगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थीही चांगले यश मिळवितात हे त्यांनी स्वकर्तृत्वातून दाखवून दिले आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमधील इंग्रजीविषयी असणारा न्यूनगंड दूर व्हावा व त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढावा यासाठी सोमनाथ यांच्या वर्गमित्रांनी गावच्या शाळेत सत्कार करून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.