नवी मुंबई, पनवेल : दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. ढोलताशाच्या निनादात मंगलमय वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाचे शहरातील विविध विसर्जन तलावांत विसर्जन करण्यात आले. नवी मुंबईसह पनवेल परिसरातही रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जनाची प्रक्रिया सुरू होती. या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले होते.दीड दिवसांच्या गणरायाला शुक्रवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जनासाठी महापालिकेने शहरातील २३ तलाव सज्ज ठेवले आहेत. त्यापैकी १४ तलावांत इटालियन गॅबियन वॉल तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. विसर्जन प्रक्रियेत भाविकांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या होत्या. स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती. महापौर जयवंत सुतार यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी विसर्जन तलावांना भेट दिली.तळोजामध्ये दीड दिवसांच्या ७०० घरगुती व एक सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यात आले. कामोठेमध्ये नऊ सार्वजनिक, ९०० घरगुती, खांदेश्वरमध्ये एक सार्वजनिक, ५८५ घरगुती, तालुका पोलीसठाण्याच्या हद्दीत घरगुती एक हजार ४७०, पनवेल शहरात एक हजार ५५० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला होता.पनवेलमध्ये कोळीवाडा-गाढी नदी, पनवेल बंदर, वडाले तलाव, तक्का, पोदी, आदई तलाव, सुकापूर, कळंबोली तलाव, खांदेश्वर शिवमंदिर, पेंधर, घोट, कोयनावेळे, कामोठे शिवमंदिर, जुईगाव, कोपरा तलाव, खारघर तलाव, बेलपाडा तलाव, मुर्बी तलाव, तुर्भे, करवले, धानसर, देवीचा पाडा आदी ४३ ठिकाणी विसर्जन करण्यात आले.
शहरात दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 3:25 AM