नारायण जाधव
नवी मुंबई : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने २९ मार्च २०२३ रोजी जागतिक तापमान वाढ लक्षात घेऊन राज्याचा उष्णता लाट कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार राज्यातील १५ जिल्हे उष्णताप्रवण असून, त्यात अनेक उपाययोजना सूचविल्या आहेत. यात मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचा समावेश नाही. मात्र, तरीही खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला उपस्थित १३ श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने राज्याचा उष्णता लाट कृती आराखड्याचे काय झाले, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन सचिव आसिम गुप्ता यांनी हा उष्णता लाट कृती आराखडा जाहीर केला आहे. यात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ज्या उपायोजना सुचविल्या आहेत, त्यांचे अनेक ठिकाणी पालन होत नसल्याचे खारघरच्या घटनेवरून निदर्शनास आले आहे.
या आहेत उपाययोजना
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दर पंधरा दिवसांनी उष्माघाताच्या रुणांबाबत आढावा घेऊन त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करणे, सर्व शासकीय रुग्णालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या उष्माघाताच्या रुग्णांची स्वतंत्र नोंद ठेवून त्याचा अहवाल सादर करणे, उष्णता प्रवण जिल्ह्यांसह इतर सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांसोबत मार्च ते जून या महिन्यात दर पंधरा दिवसांत बैठक घेऊन उष्णता लाटेचा आढावा घेणे, हेल्पलाइन क्रमांक १०४, १०८,११२, १०७७ विषयी जनजागृती करणे, २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवणे, एफएम वाहिन्यांसह वृत्तपत्रे, दूरदर्शनवर जनजागृती करणे, यात्रेची ठिकाणी, आठवडा बाजार, मोर्चे, निदर्शने, धार्मिक कार्यक्रम यातील गर्दीचे नियोजन करणे, बसस्थानक, रेल्वे स्थानक येथील पंखे सुरू ठेवणे, पाण्याची सोय करणे, शाळा सकाळच्या सत्रातच सुरू ठेवणे, बाजार समिती, शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणे, फेरीवाला झोन येथे सावली निर्माण करणे, शहरात ये-जा करणारी लोकसंख्या लक्षात घेऊन नियोजन करणे.
हे आहेत उष्णता प्रवण १३ जिल्हे
नागपूर विभागातील गडचिरोली वगळता सर्व जिल्हे, अमरावती विभागातील अमरावती वगळता सर्व जिल्हे, खान्देशातील धुळे, जळगाव आणि मराठवाड्यातील नांदेड व हिंगोली असे १३ जिल्हे उष्णता प्रवण क्षेत्रातील असल्याचे या आराखड्यात म्हटले आहे.
या आराखड्यात उष्णतेपासून बचावासाठी काय करावे, काय करू नये, याबाबतच्या सूचनांसह उन्हात रोजगार हमीची कामे करू नयेत, शहरातील बाग बगीचे दुपारी सुरू ठेवू नयेत, गर्दीवर नियंत्रण ठेवणे, उन्हात कार्यक्रम घेऊ नये, अशा महत्त्वपूर्ण सूचना आहेत.