नामदेव मोरे, नवी मुंबईऐरोलीजवळ मुंबईच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास ४०० एकर जमिनीवर मिठागरे आहेत. याठिकाणी साठविण्यात येणाऱ्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढत असून त्याचा त्रास नवी मुंबईकरांना होत आहे. आरोग्य विभाग २००६ पासून संबंधित विभागाकडे योग्य उपाययोजना करण्याची मागणी करत आहे. डासांच्या उत्पत्तीचे पुरावेही दिले असून मिठागर विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. नवी मुंबईमध्ये मागील काही महिन्यांपासून तापाची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महापालिकेने शहरात जनजागृती मोहीम राबवून नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याची माहिती दिली आहे. घर व परिसरात कुठेही पाणी साचून देवू नये, असे आवाहन केले आहे. डासांची उत्पत्ती स्थळे शोधून त्यावर योग्य उपाययोजना केल्या जात आहेत. मिठागरांमध्ये पाणी साचविण्यात येते. या परिसरात अनेक वस्तू पडल्या असून त्यामध्येही पाणी साचत आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. महापालिकेला २००६ मध्येच हा प्रश्न निदर्शनास आला होता. तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक वर्षी आरोग्य विभाग मिठागर विभागाकडे पाठपुरावा करून उपाययोजना करण्याची मागणी करीत आहे. मुख्य आरोग्य अधिकारी दीपक परोपकारी, हिवताप अधिकारी उज्ज्वला ओतूरकर नियमितपणे पाठपुरावा करीत आहेत.मिठागरांमुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याचे सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे. ऐरोली परिसरातील नागरिकांना खूपच त्रास होवू लागला आहे. या परिसरात औषध फवारणी व इतर उपाययोजना करणे आवश्यक आहे. आम्ही याविषयी महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. याविषयी योग्य कार्यवाही व्हावी अशी मागणी केली आहे. - संगीता अशोक पाटील, नगरसेविका, प्रभाग १५ ऐरोली
मिठागरांमुळे वाढतोय ‘ताप’
By admin | Published: November 09, 2015 2:51 AM