पाली : सध्या तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे माणसासह पशू-पक्षी हैराण झाले आहे. उन्हाच्या काहिलीपासून सुटका करून घेण्यासाठी माणूस शीतपेयांचा आधार घेत आहे. मात्र, पशू-पक्ष्यांना नैसर्गिक जलसाठ्यांशिवाय पर्याय नाही. यामुळे या उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी जनावरे, पक्षी नदी, तलाव आदी जलसाठ्यांचा अधार घेत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे.एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तप्त उन्हाच्या चटक्यांनी सामान्य माणूस हैराण झालाच आहेच; पण चिमणी, घारी, कबूतर, कुत्रे, मांजरी, गाई, म्हशी आदी पशू-प्राण्यांनाही उन्हाळ्याचा तडाखा बसत आहे. उष्णतेमुळे माणसासह मानवांच्याच नव्हे, तर पशू-पक्ष्यांच्या अंगातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची समस्या वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे नैसर्गिक जलस्रोत आटत आहेत. यामुळे भटकी गुरे, पशू-पक्षी, कु त्रे, जंगली प्राणी आपली तहान भागवण्यासाठी डबक्यातील साठलेले किंवा खड्ड्यातील उरलेले पाणी पीत आहेत. ही परिस्थिती जंगलात असल्याने अन्न पाण्याच्या शोधात जंगली प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. उन्हाच्या परिणामामुळे मान्सूनपूर्व कामे करताना बैलासारखी जनावरेहीे अर्धमेली होत आहेत. उन्हाचा फटका सर्वाधिक गाई, म्हशींना बसत असून दुधाचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांच्या आरोग्यासाठी खर्च करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दूध कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. अशा उन्हाच्या तडाख्यात दुधाळ जनावरांची कालवडी, रेडकू हे उन्हामुळे कासावीस होत आहेत. सध्या शेतीची मशागत सुरू असून वखाणी, सरी पाडणे, ढेकळे फोडणे यासाठी बैलांचा उपयोग केला जात आहे; परंतु उन्हामुळे हे काम सकाळी किंवा सायंकाळी करण्यास शेतकऱ्यांना भाग पडत आहे. तीव्र उन्हाळा पशू-पक्ष्यांसाठी सुसह्य व्हावा आणि पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे पशू-पक्ष्यांना भटकंती करावी लागू नये म्हणून प्रत्येकाने पशू-पक्ष्यांप्रति आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे. तसेच पशू-पक्ष्यांसाठी नागरिकांनी पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन काही संस्थांनी तसेच पक्षीप्रेमींनी के ले होते. याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रस्त्यावर फिरणारी गुरे, कुत्रे, पक्षी आदींसाठी घरे, दुकानाबाहेर पिण्याच्या पाण्याची भांडी भरून ठेवलेली दृष्टीस पडत आहेत. (वार्ताहर)
तीव्र उन्हाच्या चटक्यांनी पशू-पक्षी झाले हैराण
By admin | Published: May 03, 2017 6:01 AM