पावणेमधील केमीकल कंपनीला भीषण आग, आगीच्या झळा शेजारील कंपनीला
By नामदेव मोरे | Published: February 17, 2024 03:52 PM2024-02-17T15:52:10+5:302024-02-17T15:54:47+5:30
आग विझविण्यासाठी एमआयडीसी व महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
नवी मुंबई : ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील पावणे येथील सुजाण केमीकल कंपनीला भीषण आग लागली. आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. शेजारील कलर कंपनीमध्येही आग पसरली आहे. आग विझविण्यासाठी एमआयडीसी व महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
एमआयडीसीमध्ये सी ब्लॉकमधील केमीकल तयार करणाऱ्या सुजाण कंपनीमध्ये १ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. कंपनीमधील केमीकल साहित्याचे आग पकडल्यामुळे काही क्षणात संपूर्ण कंपनीत आग पसरली. आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट एमआयडीसीमध्ये पसरू लागल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात केली.
परंतु आग मोठी असल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. शेजारील एल लिलाधर या कलर बनविण्याच्या कंपनीमध्येही आग पसरली. आगीचा धोका वाढल्यामुळे परिसरातील सर्व कंपन्या बंद करून कामगारांना बाहेर काढले आहे.
नवी मुंबई : पावणे एमआयडीसी येथील सुजाण कंपनीला भीषण आग विझवताना अग्निशमन जय जवान शर्यतीचे प्रयत्न करीत आहेत (व्हिडिओ-संदेश रेणोसे)https://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/ym2ZVKdl4j
— Lokmat (@lokmat) February 17, 2024
घटनास्थळी परिसरातील कंपनीमधील कामगारांनीही गर्दी केली होती. एमआयडीसी परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीमध्ये कोट्यावधी रूपयांचे केमीकल व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. अद्याप कोणीही जखमी झाल्याची नोंद नव्हती. आग आटोक्यात आल्यानंतरच संपुर्ण नुकसान व कोण जखमी झाले याची सविस्तर माहिती उपलब्ध होईल अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.