नवी मुंबई : ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील पावणे येथील सुजाण केमीकल कंपनीला भीषण आग लागली. आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. शेजारील कलर कंपनीमध्येही आग पसरली आहे. आग विझविण्यासाठी एमआयडीसी व महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
एमआयडीसीमध्ये सी ब्लॉकमधील केमीकल तयार करणाऱ्या सुजाण कंपनीमध्ये १ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. कंपनीमधील केमीकल साहित्याचे आग पकडल्यामुळे काही क्षणात संपूर्ण कंपनीत आग पसरली. आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट एमआयडीसीमध्ये पसरू लागल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात केली.
परंतु आग मोठी असल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. शेजारील एल लिलाधर या कलर बनविण्याच्या कंपनीमध्येही आग पसरली. आगीचा धोका वाढल्यामुळे परिसरातील सर्व कंपन्या बंद करून कामगारांना बाहेर काढले आहे.