पावणे एमआयडीसीत भीषण आग
By admin | Published: January 8, 2016 02:15 AM2016-01-08T02:15:16+5:302016-01-08T02:15:16+5:30
पावणे एमआयडीसीतील वेलकम या रासायनिक लॅबरोटरीजला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत हे युनिट जळून भस्मसात झाले आहे.
नवी मुंबई : पावणे एमआयडीसीतील वेलकम या रासायनिक लॅबरोटरीजला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत हे युनिट जळून भस्मसात झाले आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु आग विझविताना अग्निशमन दलाचा एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.
पावणे एमआयडीसीत प्लॉट क्रमांक १८३ वर ही वेलकेमिकल लॅब आहे. बुधवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास या लॅबला अचानक आग लागली. विशेष म्हणजे काही वेळातच आगीने आक्राळ रूप धारण केल्याने तातडीने एमआयडीसीच्या पावणे येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सुरुवातीला दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. परंतु आगीचे स्वरूप पाहून आणखी बंब मागविण्यात आले. वाशी, नेरूळ, ऐरोली, नेरूळ एमआयडीसी, तळोजा एमआयडीसी तसेच ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि सिडको असे एकूण १५ बंब घटनास्थळी मागविण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर ८.३0 वाजण्याच्या सुमारास आग काहीशी आटोक्यात आली. त्यानंतर ११ वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. साधारण पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर संपूर्ण नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु अग्निशमन दलाचे फायरमेन एस.आर. पाटील हे किरकोळ जखमी झाल्याचे पावणे अग्निशमन केंद्राचे मुख्य अधिकारी सुरेंद्र चौधरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)