नवी मुंबई : मुसळधार पावसाने सोमवारी रात्री सीबीडी सेक्टर-५मध्ये भूस्खलन झाले. डोंगर उतारावरील जमीन जवळपास ५० फूट खचल्याने कल्पतरू इमारतीची संरक्षण भिंत तुटून मातीचा भराव इमारतीच्या आवारात पसरला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई व नवी मुंबईकरांना २६ जुलै २००५च्या महाप्रलयाची आठवण करून दिली. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सेक्टर ५मधील कल्पतरू सोसायटीच्या वरील बाजूला भूस्खलन झाले. जवळपास ५० फूट परिसरातील जमिनीचा भाग खचला. यामुळे सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली. अचानक झालेल्या आवाजामुळे सोसायटीमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांनी तत्काळ महापालिकेच्या अधिकाºयांना माहिती देऊन मदत उपलब्ध करून दिली. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. महापौर सुधाकर सोनावणे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन मातीचे ढिगारे तत्काळ बाजूला करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. शहरात दिवसभर मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबईमध्ये नोकरीनिमित्त निघालेले चाकरमानी दिवसभर ट्रेन व रोडमध्येच अडकून राहिले होते. हार्बर रेल्वे धिम्या गतीने सुरू होती. सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूकही संथ गतीने सुरू होती. शहरात अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या.मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असले, तरी सायंकाळपर्यंत कुठेही जीवितहानी झाली नव्हती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी, फळ व मसाला मार्केटमध्ये पाणी साचले होते. सानपाडा सेक्टर-२मध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले होते. बोनसरी व इतर अनेक ठिकाणी नैसर्गिक नाल्यातील पाणी वसाहतीमध्ये शिरले होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला होता.
मुसळधार पावसाने नवी मुंबईमध्ये भूस्खलन, संरक्षण भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:27 AM