नवी मुंबईत पावसाचा जोर कायम, ठिकठिकाणी साचले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 01:04 AM2020-07-08T01:04:36+5:302020-07-08T01:04:57+5:30
नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात ४ जुलैपासून १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीपेक्षा या वर्षी शहरातील मान्सूनपूर्व कामांना उशिराने सुरुवात करण्यात आली होती.
नवी मुंबई : शहरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शहरात लॉकडाऊन असल्याने वाहतूक आणि जनजीवनावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. तरी शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना मात्र घडत आहेत. यामुळे मान्सूनपूर्व कामांचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरम्यान, ऐरोलीत झाड कोसळून एका व्यक्तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे.
नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात ४ जुलैपासून १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीपेक्षा या वर्षी शहरातील मान्सूनपूर्व कामांना उशिराने सुरुवात करण्यात आली होती. ३ जुलैपासून शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, दिघा, ऐरोली सर्वच विभागांत जोरदार पाऊस पडत आहे. मागील पाच दिवसांत शहरात एकूण ४९३.६0 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील विविध भागांत पाणी साचण्याच्या, तसेच झाडे कोसळण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. मंगळवारी झालेल्या पावसामुळे बेलापूरमधील कोकणभवन इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते, तसेच शिरवणे भुयारी मार्ग, ज्वेल आॅफ नवी मुंबई, तसेच शहराच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मे महिन्यात मान्सूनपूर्व कामे करताना पावसाळी नाल्यांची सफाई झाली नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, तसेच धोकादायक झाडांची छाटणीसुद्धा करण्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या महिन्यात आलेल्या निसर्ग वादळात शहराच्या विविध भागांत शेकडो झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. मंगळवारी वाशीत एका वाहनावर झाड कोसळले.
पनवेलमधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पनवेल : मागील दोन दिवसांपासून पनवेल तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पनवेलमधील गाढी, तसेच कासाडी यांच्यासह उपनद्या ओसंडून वाहत असल्याने, तहसीलदारांनी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने माथेरानच्या डोंगरांतून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी पनवेलच्या दिशेने वाहत आहे.
तालुक्यातील जवळजवळ ४0 ते ५0 नदीकाठच्या गावांना अतिवृष्टीमुळे दरड कोसळणे, गावात पाणी शिरल्याचा धोका असल्याने तहसीलदार अमित सानप यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे, तसेच नदीपात्रात न उतरणे, जनावरांना नदीपात्रात न सोडण्याच्या खबरदारी ग्रामस्थांनी घेण्याचे अवाहन सानप यांनी केले.