मुसळधार पावसाने नवी मुंबईला झोडपले; भाजीपाला खरेदीकडे ग्राहकांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 05:00 PM2022-09-16T17:00:14+5:302022-09-16T17:01:15+5:30

मुसळधार पावसामुळे अपघात होण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Heavy rains lash Navi Mumbai; Consumers not coming to shopping in market | मुसळधार पावसाने नवी मुंबईला झोडपले; भाजीपाला खरेदीकडे ग्राहकांची पाठ

मुसळधार पावसाने नवी मुंबईला झोडपले; भाजीपाला खरेदीकडे ग्राहकांची पाठ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधारपावसामुळे नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. पावसामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांची गैरसोय झाली. रस्त्यावर अनेक ठिकाणी एक फुट पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली असून ग्राहकांनी पाठ फिरविल्याने २५ टक्के मालाची विक्रीच झाली नाही. विक्री न झालेल्या पालेभाज्या फेकून द्याव्या लागल्या.

नवी मुंबईमध्ये गुरूवारी २४ तासामध्ये ५७ मीमी पावसाची नोंद झाली. एक ठिकाणी वृक्ष कोसळल्याची घटना घडली होती. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५५.५० मीमी एवढी पावसाची नोंद झाली आहे. दिघा मध्ये ७४ व कोपरखैरणेमध्ये ७० मीमी एवढी पावसाची नोंद झाली आहे. तुर्भे, मॅफ्को मार्केट परिसरात रोडवर पाणी साचले होते. सानपाडा, कोपरखैरणे, करावे भुयारी मार्गामध्ये पाणी साचले आहे. रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होत होती. खड्यांमुळे मोटारसायकल घसरून किरकोळ अपघात होण्याच्या घटनाही होत होत्या.

मुसळधार पावसामुळे अपघात होण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विनाकारण घराबाहेर पडू नये. धोकादायक वृक्षांच्या खालून चालू नये व वाहनेही उभी करू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
एपीएमसीमध्ये २७५६ टन भाजीपाल्याची आवक

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसामुळे आवक कमी झाली आहे. प्रतिदिन सरासरी ६०० ते ६५० वाहनांची आवक होते. शुक्रवारी ५४५ वाहनांची आवक झाली आहे. २७५६ टन भाजीपाला विक्रीसाठी आला असून त्यामध्ये ४ लाख ४५ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे २५ टक्के मालाची विक्रीच झाली नाही. खराब झालेल्या पालेभाज्या फेकून द्याव्या लागल्या. मार्केटमध्ये खराब भाजीपाल्याचे ढीग पहावयास मिळत होते.

मोरबे धरण ९८ टक्के भरले

नवी मुंबई महानगरपालिकेला मोरबे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. धरण परिसरातही पाऊस वाढला आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून या परिसरात ३०८८ मीमी एवढा पाऊस पडला आहे. धरणातील पाणी पातळी ८६.२८ मीटर पर्यंत वाढली आहे. अजून पावणेदोन मीटरपर्यंत पाणी साठा वाढला की धरण ओव्हरफ्लो होणार आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर पुढील दोन दिवसात धरण भरण्याची शक्यता आहे.

Web Title: Heavy rains lash Navi Mumbai; Consumers not coming to shopping in market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस