नवी मुंबई : पामबीच रोडवर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे; परंतु नियम धाब्यावर बसवून बिनधास्तपणे ट्रक, टेम्पो व डम्परची वाहतूक सुरू आहे. यामुळे रस्ता खराब होत असून अपघाताची शक्यताही वाढली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होऊ लागले आहे.सायन-पनवेल महामार्गानंतर नवी मुंबईमधील सर्वात प्रमुख रोड म्हणून पाम बीच रोडची ओळख आहे. महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी व वाहतूक गतिशील करण्यासाठी सिडकोने हा रस्ता बनविला. या रोडमुळे वाशी ते बेलापूर दरम्यान नऊ किलोमीटर अंतर वेगाने पूर्ण करणे शक्य होत आहे. या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी आहे. या रोडवरील वाहनांची संख्या नियंत्रित राहावी, वाहतूककोंडी होऊ नये व अपघात कमी व्हावे, यासाठी ही उपाययोजना करण्यात आली होती. याशिवाय अवजड वाहनांमुळे रोडवर लवकर खड्डे पडण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टींमुळे ही बंदी घातलेली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल परिसरातील खड्डे नसलेला हा एकमेव रस्ता आहे. पूर्वी सिडको व आता महापालिका रोडची नियमित देखभाल व दुरुस्ती करत आहे. कुठेही खड्डे पडणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. ठरावीक वर्षानंतर संपूर्ण रोडवर डांबर व खडीचा थर दिला जातो. यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापरही केला जात आहे. मागील काही महिन्यांपासून या रोडवर बंदीचे आदेश झुगारून अवजड वाहतूक सुरू आहे. ट्रक, टेम्पो, स्कूल बस, डम्पर, खासगी प्रवासीवाहतूक करणाºया बसेस या रोडवरून जात आहेत.दिवसभर अवजड वाहनांची संख्या पाम बीच रोडवर मोठ्या प्रमाणात असते. सायंकाळी ७ नंतर यामध्ये वाढ होत आहे. रात्री ट्रॅव्हल्स व इतर खासगी बसेसची संख्या जास्त असते. अपवादात्मक स्थितीमध्ये रात्री ट्रेलरचीही ये-जा सुरू असते. यामुळे रस्ता खराब होण्याची शक्यता आहे. याशिवाय अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे.अवजड वाहनांना दुचाकी व कारची धडक होऊन जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने अवजड वाहनांवर कारवाई करावी. याशिवाय या रोडवरील इतर समस्याही सोडविण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.पोलिसांनी कडक कारवाई करावीपाम बीच रोडवर अवजड वाहनांची वाहतूक दिवसरात्र सुरू आहे. नियमबाह्यपणे पाम बीचवरून ये-जा करणाºया ट्रक, डम्पर व बसेसवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अपघात होण्यापूर्वी अवैध वाहतूक बंद करावी, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.पादचाºयांचे प्रमाणही वाढलेपाम बीच रोडवर पादचाºयांनाही मनाई आहे; परंतु सद्यस्थितीमध्ये रोज पहाटे शेकडो नागरिक चालण्यासाठी व जॉगिंग करण्यासाठी पाम बीच रोडवर येत असतात. सीवूड ते मोराज दरम्यान हे प्रमाण जास्त आहे. २००५ मध्ये मोराज व नेरुळ दरम्यान एपीएमसीच्या वाहनाने धडक दिल्यामुळे तीन पादचाºयांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.हेल्मेट विक्रीही सुरूपाम बीच रोडवर हेल्मेट विक्री करणारे, पीयूसी चेक करणारे वाहन व इतर विक्रेतेही पाम बीचरोडवर अधून-मधून व्यवसाय करू लागले आहेत. त्यांच्यामुळेही या रोडवर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.कबुतरांमुळेही अपघाताची शक्यतासारसोळे व मोराज सर्कल दरम्यान असलेल्या छोट्या पुलाच्या कठड्यावर काही महिन्यांपासून कबुतरांसाठी धान्य ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी दिवसभर शेकडो कबुतर घिरट्या घालत असतात. येथे धान्य टाकण्याचे थांबविले नाही तर गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पाम बीच रोडवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल.- सुनील लोखंडे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक
पाम बीच रोडवर अवजड वाहनांची घुसखोरी सुरूच; अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:42 AM