रोडपालीत अवजड वाहनांची पार्किंग, रहिवाशांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 02:02 AM2019-11-28T02:02:01+5:302019-11-28T02:02:18+5:30
कळंबोलीसह रोडपाली परिसरातील नागरी वसाहतीत अवजड वाहनांनी शिरकाव केला आहे.
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : कळंबोलीसह रोडपाली परिसरातील नागरी वसाहतीत अवजड वाहनांनी शिरकाव केला आहे. ट्रक, टेम्पो आणि कंटेनरसारखी वाहने इमारतींच्या अगदी प्रवेशद्वारावर बेकायदा पार्क केली जात असल्याने रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या प्रकाराकडे वाहतूक विभागाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
कळंबोलीजवळ रोडपाली गावालगत नागरी वस्ती वाढली आहे. सिडकोच्या माध्यमातून येथे सेक्टर्स निर्माण केले आहेत. खारघरप्रमाणेच येथेसुद्धा विस्तीर्ण रस्ते आणि पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत; परंतु बेकायदा पार्किंगमुळे या सुविधांचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येते. रस्त्यांवर दोन्ही बाजूने अवजड वाहने उभी केली जातात. त्यामध्ये ट्रक, टँकर आणि कंटेनर यांचे प्रमाण जास्त आहे. बाजूलाच स्टील मार्के ट असल्याने मोठ्या प्रमाणात वाहने या भागात येतात. यातील बहुतांशी वाहने शेजारच्या नागरी वसाहतीत पार्क केली जात आहेत. विशेष म्हणजे, याच वसाहतीत संबंधित ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे मालक, चालक तसेच वाहक राहत असल्याने आपली वाहने घराजवळ पार्क करण्याचा कल वाढला आहे. वसाहतीतील रस्ते अरुंद असल्याने या अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडीचा त्रास होत आहे.
नागरी वसाहतीत अवजड वाहनांना बंदी आहेत. त्यासाठी सिडकोने ठिकठिकाणी हाइट गेज लावले आहेत. मात्र, हे हाइट गेज तोडून वाहनचालक सर्रासपणे वाहने वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर पार्क करीत असल्याचे दिसून येते. कळंबोली सेक्टर १० ई परिसरातील परिस्थिती अत्यंत संतापजनक आहे. येथील रस्त्यांना पार्किंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अवजड वाहने उभी केली जात आहेत. अनेक भागात इमारतींच्या अगदी प्रवेशद्वारावर वाहने उभी केली जात असल्याने रहिवाशांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रहिवाशांना आपल्या दुचाकीही बाहेर काढतानाही कसरत करावी लागत आहे. गाड्यांचा दिवसरात्र कर्कश आवाज, धूर, हॉर्नचा गोंगाट आदीमुळे रहिवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात रहिवाशांच्या वतीने अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, कोणतीही कारवाई झाली नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
कळंबोलीच्या सेक्टर १७ मध्येही कमी-अधिक प्रमाणात अशीच अवस्था आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील मोकळ्या जागांवर बेकायदा पे अॅण्ड पार्किंगसुद्धा सुरू करण्यात आले आहे. या प्रकाराकडेही संबंधित विभागाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.
मद्यपी चालकांचा उच्छाद
रस्त्यावर आणि मोकळ्या भूखंडावर बेकायदेशीरपणे अवजड वाहने उभी केली जातात. या वाहनांचे चालक व वाहक येथेच जेवण बनवतात. रात्रीच्या वेळी तर या ठिकाणी सर्रासपणे दारूच्या पार्टी चालतात. अनेकदा त्यांच्यात मोठमोठ्याने भांडणे होतात. या प्रकारामुळे परिसरातील महिलांना रात्रीच्या वेळी बाहेर पडणे अवघड झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा
आपली अवजड वाहने रस्त्यावर बेकायदेशीर पार्क करून चालक आणि वाहक त्यातच राहतात. आंघोळ, प्रात:विधी तसेच जेवण आदी दैनंदिन क्रिया उघड्यावरच केल्या जातात. त्यामुळे परिसरात कमालीची दुर्गंधी पसरली जात आहे. ट्रक व कंटेनरचालकांच्या या उच्छादामुळे परिसरातील स्वच्छतेला बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्वच्छ शहर अभियानाला हरताळ फासला जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.