कळंबोली : सिडको वसाहतीत ठिकठिकाणी भरत असलेल्या आठवडी बाजारांवर महापालिकेने टाच आणली आहे. मागील आठवड्यात खारघर, मंगळवारी कळंबोली आणि बुधवारी खांदा वसाहतीत पथक अवतरले आणि काही मिनिटात हा बाजार गायब झाला. कामोठे वसाहतीत सुध्दा अशा प्रकारची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी तसेच इतर बेकायदेशीर प्रकारांना आळा बसण्यास सुरुवात झाली आहे. वसाहतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून आठवडी बाजार भरविण्यात येत होते. काही स्थानिक तरुण अशा प्रकारचे बाजार भरवत असत. मुंबईहून येणाऱ्या विक्रे त्यांकडून पैसे वसुली होत असे. अशा प्रकारे दररोज एका वसाहतीत त्याचबरोबर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आठवडी बाजार भरवला जात होता. या ठिकाणी मुंबईहून कपडे, विविध घरगुती वस्तू, चप्पल यासारख्या अनेक गोष्टी विक्रीसाठी आणतात. कळंबोली वसाहतीत मुख्य रस्त्यावर मंगळवारी आठवडी बाजार भरविण्यात येत होता. रस्त्यावर चालण्याकरिता सुध्दा जागा शिल्लक राहत नव्हती. त्यामुळे विद्यार्थी, महिला, लहान मुले व वृध्दांची कुचंबणा होत असे. खांदा वसाहतीत सेक्टर ७ व ९ च्या दरम्यान असलेल्या रस्त्यावर बुधवारी मार्केट भरवले जात होते, तर नवीन पनवेलला शुक्र वार बाजार असतो. कामोठे वसाहत तर आठवडी बाजाराकरिता फेमस झाली आहे. आठवड्यातील गुरुवार, शुक्र वार व शनिवार हे तीन दिवस या वसाहतीकरिता राखीव ठेवण्यात आले होते. काही वसुली करणारे भाई या ठिकाणी बाजार भरवत होते. याकरिता संपूर्ण रस्ते अडवले जातात. कामोठे वसाहतीतील सेक्टर-१६ आणि १७ येथील रस्ते आठवडे बाजारवाले व्यापून टाकीत आहेत. यातून आठवड्याला हजारो रुपयांची कमाई वसुली करणारे भाई करीत आहेत. खारघरमध्ये रविवार आणि मंगळवारी अनुक्र मे १९ आणि ३५ येथे दोन दिवस आठवडी बाजार भरवण्यात येत होता. यासंदर्भात कामोठे येथील अंकुश मोहिते व गुरु देव आर्केड सोसायटीतील रहिवाशांनी वेळोवेळी सिडको व पोलीस ठाण्यात पाठपुरावा केला होता. परंतु गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्तांनी खारघर येथे जावून आठवडी बाजार बंद पाडले. त्याचबरोबर मंगळवारी रात्री कळंबोलीत आयुक्त आले आणि त्यांनी थेट हिंदुस्थान बँकेजवळील आठवडी बाजार गाठला. यापुढे अशा प्रकारे बाजार भरवता येणार नाही अशी तंबी त्यांनी दिली. बुधवारी महापालिकेचे पथक खांदा वसाहतीतील आठवडी बाजारात पोहचले त्यामुळे विक्रे त्यांनी आपली दुकाने मांडली नाहीत, तसेच वसुली दादांनी बाजारातून धूम ठोकली. त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलाच तसेच कचरा, प्लास्टिक दुसऱ्या दिवशी रस्त्यावर दिसून आले नाही. (वार्ताहर)
सिडको वसाहतीतील आठवडी बाजारांवर टाच
By admin | Published: January 26, 2017 3:29 AM