निवासी जागेवरील व्यवसायांवर येणार टाच
By Admin | Published: December 24, 2016 03:29 AM2016-12-24T03:29:51+5:302016-12-24T03:29:51+5:30
पनवेल महानगरपालिकेने गेल्या पावणेतीन महिन्यांत बरेचसे काम करून पनवेलकरांची वाहवा वाहवा मिळवली आहे. बॅनरपासून ते रस्ते
अरुणकुमार मेहत्रे / कळंबोली
पनवेल महानगरपालिकेने गेल्या पावणेतीन महिन्यांत बरेचसे काम करून पनवेलकरांची वाहवा वाहवा मिळवली आहे. बॅनरपासून ते रस्ते अतिक्रमणमुक्त करणाऱ्या महापालिका आयुक्तांनी आता आपले लक्ष महापालिका हद्दीतील रहिवासी घरांमध्ये सुरू असलेल्या व्यावसायिक वापराकडे वळवले आहे. कामोठेवगळता इतर सिडको वसाहतीत असा वापर सर्रास करण्यात येत आहे. अशा प्रकारे व्यवसाय करणाऱ्यांवर गदा येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
नवीन पनवेलमध्ये सेक्टर १ ते ४ या ठिकाणी बंगलो आहेत. त्यामध्ये अनेकांनी व्यवसाय थाटले आहेत. वेगवेगळी दुकाने येथे दिसून येतात. त्याशिवाय ए टाईप, ई वन येथेही सिडकोच्या घरांमध्ये व्यावसायिक वापर सुरू आहे. ए टाईप या प्रकारची बैठी घरे सिडकोने बांधली होती. मात्र आता त्याच घरांवर दोन ते तीन मजले बांधण्यात आले आहेत. खाली दुकान आणि वरती घर अशी स्थिती आहे. अनेकांनी खाली गाळे काढून वेगवेगळे व्यवसाय थाटले आहेत. नवीन पनवेल सेक्टर ६, तसेच खांदा वसाहतीत सेक्टर ७ मध्ये ४०, ६०, १००, १२० मीटरचे रोहाऊस आहेत. तिथेही मालकांनी खाली गाळे काढले आहेत. ते व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. तीच स्थिती खारघरमध्ये सुध्दा आहे. रोहाऊसेसचा वापर व्यावसायिक कारणाकरिता मोठ्या प्रमाणात केला जात आहे. येथे किराणा दुकान, ब्युटी पार्लर, सलून, लाँड्री, क्लासेस थाटण्यात आले आहेत. काहींनी आपली कार्यालये या ठिकाणी सुरू केली आहेत. कळंबोली वसाहतीत एलआयजी, तसेच इतर बैठ्या घरांवर बांधकाम केले आहे. मूळ घरांना व्यावसायिक गाळ्यांचा लूक देवून तिथे व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. स्मृती गार्डनच्या पाठीमागे तर मोठमोठे स्पेअर पार्टच्या दुकानांचे बस्तान आहे.
मुख्य रस्त्यालगत ज्वेलरी, वाईन शॉप, चप्पल, कपड्यांची दुकाने दृष्टिक्षेपास पडत आहेत. याशिवाय सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शाळेलगत तर मोठी बाजारपेठच उभी राहिलेली आहे. येथील सगळी घरे बैठी आहेत. अल्प उत्पन्न गटातील लोकांना ते सिडकोकडून देण्यात आलेले आहेत. त्यांचा वापर हा राहण्याकरिता न करता तिथे दुकाने गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. ज्या कारणाकरिता जागा आहे त्यासाठीच त्याचा वापर झाला पाहिजे, अशी पनवेल आयुक्तांची भूमिका आहे.