- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : बँका अथवा एटीएम मशिन लुटण्याच्या घटना वारंवार घडत असूनही शहरातील वित्तसंस्थांकडून त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. जुईनगर येथील बडोदा बँक लुटल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी नोटिसा बजावून सर्व बँकांना खबरदारीच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतरही बहुतांश वित्तसंस्थांकडून सीसीटीव्ही, अलार्म बसवण्यासह सुरक्षारक्षक नेमण्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.पोलिसांकडून सातत्याने सूचना देऊनही शहरातील वित्तसंस्थांकडून सुरक्षेत हलगर्जी होताना दिसून येत आहे. परिणामी बँक तसेच एटीएम लुटीच्या घटना सुरूच आहेत. २२ ते २५ मार्च दरम्यान एपीएमसी सेक्टर १९ येथील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये घरफोडीचा प्रयत्न झाला आहे. तीन दिवसांनी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मंगळवार, २६ मार्च रोजी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बँकेच्या मागील खिडकीचे ग्रील कापून चोरट्यांनी बँक लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी बँकेत सुरक्षारक्षकाची नियुक्तिच करण्यात आली नव्हता. शिवाय अलार्म सिस्टीमही नव्हती. सुरक्षेत झालेल्या निष्काळजीचा ठपका एपीएमसी पोलिसांनी बँकेवरच ठेवला. या प्रकारावरून वित्तसंस्थांकडून सुरक्षेच्या बाबतीत अजूनही हलगर्जी होत असल्याचे दिसून येत आहे.देशभरात गाजलेल्या जुईनगर येथील बडोदा बँकेवरील दरोड्याचे उदाहरण समोर असताना वित्तसंस्थांकडून ग्राहक ठेवीच्या सुरक्षेकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. ११ नोव्हेंबर २०१७ रोजी घडलेल्या या प्रकरणात गुन्हेगारांनी सुमारे २५ फूट लांब भुयार खोदून बँकेच्या लॉकर रूममध्ये प्रवेश केला होता. स्क्रू ड्रायव्हरने लॉकर उघडून सुमारे सहा कोटींचा ऐवज चोरून नेला होता. अशा प्रकारे बँक लुटल्याची ही देशातील दुसरी घटना होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रातील सर्व वित्तसंस्थांना नोटिसा बजावून सुरक्षेच्या अनुषंगाने खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र दीड वर्षात या परिस्थितीमध्ये सुधार झाला नसल्याचे दिसून येत आहे.कोणत्याही ठिकाणी बँक सुरू करण्यापूर्वी, जागेची निवड करताना व लॉकररूम बनवताना घ्यायच्या खबरदारीबाबत आरबीआयची नियमावली आहे. त्यानंतरही अनेक बँका व त्यांचे एटीएम सेंटर कच्च्या बांधकामाच्या जागेत चालवले जात आहेत. तर बहुतेक बँका व एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षकच नसल्याचेही चित्र पाहायला मिळते. त्यामुळे सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही अथवा सेफ्टी अलार्म नसलेल्या बँका अथवा एटीएम सेंटर फोडून मुद्देमाल लुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.महत्त्वाचे गुन्हे...३ मार्च २००८रोजी नेरुळच्या नॅशनल को- आॅपरेटिव्ह बँकेवर जीवानी गँगच्या टोळीने दरोडा टाकला होता. याच टोळीकडून आॅक्टोबर २००६ मध्ये ऐरोलीतील बँक लुटली जात असताना, त्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब आढाव यांना गोळी लागून त्यांचा मृत्यू झालेला.६ आॅगस्ट २०१६सीवूड येथील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर भरदिवसा दरोडा पडला होता. पाच व्यक्तींनी त्याठिकाणचे सुमारे २३ किलो सोने व ९ लाखांची रोकड लुटली होती. तर हा गुन्हा करतेवेळी नाडर टोळीने मुद्देमालासोबत तिथला सीसीटीव्हीचाडीव्हीआर देखील पळवला होता.८ आॅगस्ट २०१७एटीएममध्ये जमा करण्यासाठी घेऊन जात असलेली कॅश लुटल्याचा प्रकार खारघरमध्ये घडला होता. कॅशव्हॅनमधील सुरक्षारक्षक व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटारूंनी रोकड पळवली. या गुन्ह्यात राज्याबाहेरील टोळीचा समावेश असल्याचे उघड झाले.११ नोव्हेंबर २०१७२५ फूट लांबीचे भुयार खोदून जुईनगर येथील बँक आॅफ बडोदा बँक लुटण्यात आली होती. त्यामध्ये ग्राहकांच्या लॉकरमधील सुमारे ६ कोटींचा मुद्देमाल चोरीला गेला होता. गुन्हेगारांनी बँकेपासून तिसरा गाळा भाड्याने घेतल्यानंतर खाते उघडण्याच्या बहाण्याने अनेकदा बँकेची आतून पाहणी केली होती. त्यानुसार बँकेच्या खालून भुयार खोदून लॉकर रूममध्ये प्रवेश मिळवला होता. अशा प्रकारे बँक लुटल्याची ही देशातली दुसरी घटना होती.८ आॅगस्ट २०१८एपीएमसी दाणाबंदर येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत घरफोडीचा प्रयत्न झाला. तीन ठिकाणचे ग्रील तोडून चोरटे बँकेच्या मुख्य दरवाजापर्यंत पोचले असता सायरन वाजला. यामुळे त्यांना पळ काढावा लागल्याने बँकेची लूट टळली. मात्र घटनेवेळी त्याठिकाणी सुरक्षारक्षक कार्यरत नसल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.२१ जुलै २०१८कामोठे येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झालेला. त्याठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याची संधी साधून गुन्हेगारांनी हा प्रकार केला. मात्र मशिन न फुटल्याने त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला व त्यांना रिकाम्या हाती जावे लागले होते.५ जानेवारी २०१८नेरुळ रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडले. या गुन्ह्यात एटीएममधील लाखो रुपये चोरीला गेले होते. तर घटनेवेळी तिथला सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आले होते.२२ मार्च २०१९एपीएमसी बाजार समिती येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत घरफोडीचा प्रयत्न झाला. पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरील या बँकेला रात्री सुरक्षारक्षक नव्हता. याचा फायदा घेत चोरट्यांनी मागच्या खिडकीचे ग्रील कापून आत प्रवेश केला. मात्र लॉकर फोडता न आल्याने त्यांना रिकाम्या हाती परत जावे लागल्याने बँकेची लूट टळली.बँक अथवा एटीएम सेंटरच्या सुरक्षेसाठी संबंधित वित्तसंस्थांना आरबीआयच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना यापूर्वी करण्यात आल्या आहेत. तसेच आरबीआयच्या अधिकाऱ्यांमार्फत सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती देखील बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यानंतरही सुरक्षेत हलगर्जी दिसून येत असल्याने संबंधित वित्तसंस्थांना पुन्हा नोटिसा बजावण्यात येतील.- तुषार दोशी,पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखा
शहरातील वित्तसंस्थांची सुरक्षेत हलगर्जी; एपीएमसीमधील बँकेची लूट थोडक्यात टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:33 AM