नवी मुंबई : नवी मुंबई शहरात दुचाकींच्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, डोक्यात हेल्मेट नसल्यामुळे दुर्दैवाने मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करून सुरक्षिततेसाठी, वाहतूक सुरक्षेच्या नियमांच्या पालनासाठी पामबीच शेजारी असलेल्या महापालिका मुख्यालयात ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ उपक्रमाची सुरु वात करण्यात आली आहे. यापुढे पालिका मुख्यालयात येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट नसल्यास प्रवेश मिळणार नाही.
वाहतुकीच्या कायद्याची आठवण करून द्यावी लागणे हे चुकीचे असून, स्वत:च्या सुरक्षेबद्दल जागरूक होऊन वाहतूक नियमांचे पालन करावे, असे मत व्यक्त करीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांनी नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाने महापालिका मुख्यालयाची निवड ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ उपक्रमासाठी केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे हे आपले केवळ कर्तव्य नसून, आपल्या स्वत:च्या ते सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी हे जबाबदार घटक असून, त्यांच्यामार्फत हेल्मेटसह सुरक्षित प्रवास हा संदेश जनमानसात चांगल्या रीतीने प्रसारित होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनी व्यक्त केला. नवी मुंबईत मागील वर्षी रस्ते अपघातात २५८ नागरिक दुर्दैवीरीत्या मृत्युमुखी पडले असून, त्यापैकी १२७ नागरिक बाइकर्स असल्याचे वाहतूक पोलीस उपआयुक्त सुनील लोखंडे यांनी सांगितले. ९० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होत असून प्रत्येकाने वाहन चालवताना आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगत, हेल्मेट ही दुचाकीस्वारांची सुरक्षित कवचकुंडले असल्याचे लोखंडे म्हणाले.
महापालिका मुख्यालयाला दररोज हजारो नागरिक भेट देत असल्याने हा हेल्मेटयुक्त परिसर असल्याचा फलक नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश प्रसारित करण्यासाठी उपयोगी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील नागरिकांनी दुचाकी चालवताना स्वत:च्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट परिधान करणे गरजेचे असून, महानगरपालिका मुख्यालय इमारत परिसर हा हेल्मेटयुक्त परिसर असल्याची नोंद नागरिकांनी घ्यावी व हेल्मेट परिधान करूनच दुचाकी चालवावी, असे आवाहन महापालिका आणि वाहतूक पोलीस विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
याप्रसंगी महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, कर विभागाचे उपआयुक्त अमोल यादव, शिक्षणाधिकारी संदीप संगवे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड, वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अरु ण पाटील, एन.आर.आय. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख,सीवूड वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आदी अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.