नवी मुंबई - आरटीईअंतर्गत आरक्षित २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया प्रभावी राबवण्यात महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून निष्काळजीपणा होत होता. यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण विभागाच्या वतीने मदत केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार काही दिवसांत सुरू होणाºया आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात पालकांच्या शंकांचे निराकरण होण्यास मदत मिळणार आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९नुसार २५ टक्के प्रवेश कोटा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवला जातो. त्याकरिता पात्र पालकांनी त्यांच्या पाल्याचे अर्ज शासनाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन भरायचे आहेत. या प्रक्रियेपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, त्याकरिता शिक्षण विभागाकडून पालकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. तशा शासनाच्याही सूचना आहेत; परंतु त्याकडे पालिकेचे शिक्षण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत होते. त्यामागे खासगी शाळांचा हेतू साध्य करण्याचा उद्देश असल्याचा आरोप नागरिकांकडून होत होता. तर मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनीही शिक्षण मंडळाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती.आरटीई अंतर्गतच्या राखीव जागा खासगी शाळांकडून डोनेशनच्या नावाखाली भरभक्कम रक्कम घेऊन भरल्या जाण्याची शक्यता असते. यामुळे आरटीईबाबत जनजागृती आवश्यक असतानाच, शाळांच्या नोंदणी सुरू असतानाही पालिकेच्या शिक्षण मंडळाने २२ जानेवारीलाच प्रसिद्धिपत्रक काढून प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र संकेतस्थळावर लॉगिन होत नसल्याने पालकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली होती. शिवाय शाळांच्या बाहेर आरटीईअंतर्गतच्या राखीव कोट्याची माहिती लावणे, नोंदणी प्रक्रियेबाबत पालकांमध्ये जनजागृती करणे, आवश्यक असतानाही त्याला बगल दिली होती. यासंदर्भातचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच झोपी गेलेल्या शिक्षण मंडळाला जाग आली आहे. वृत्तानंतर सुधारित प्रसिद्धिपत्रक काढून आॅनलाइन नोंदणी सुरू नसल्याचे सांगत, पालकांच्या मार्गदर्शनासाठी दहा ठिकाणी मदतकेंद्र सुरू केल्याची माहिती दिली आहे.सकाळी १० ते १ व दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळेत ही केंद्रे सुरू राहणार आहेत. त्यापैकी १० ते १ या वेळेत नेरुळ विभागात पालिका शाळा क्रमांक १, शिरवणे विभागात शाळा क्रमांक १५, घणसोली विभागात शाळा क्रमांक ४२, दिघा विभागात शाळा क्रमांक ५२ व कारकरीपाडा येथील शाळा क्रमांक ५५चा समावेश आहे. तर दुपारी २ ते ५.३० वेळेत चालणाºया केंद्रात तुर्भे इंदिरानगर येथील शाळा क्रमांक २०, वाशी विभागात शाळा क्रमांक २८, कोपरखैरणेतील शाळा क्रमांक ३१, ऐरोलीतील शाळा क्रमांक ४८ व कोपरखैरणेतील शाळा क्रमांक ३८चा समावेश आहे. त्याशिवाय सीबीडी येथील पालिका मुख्यालयातील शिक्षण मंडळाच्या कार्यालयातूनही पालकांच्या शंकांचे निराकरण केले जाणार आहे.
आरटीईच्या प्रवेशासाठी मदतकेंद्र सुरू, ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 6:59 AM