पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच, माथाडी संघटनेची ६० लाख रुपयांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 02:27 AM2019-08-11T02:27:40+5:302019-08-11T02:29:06+5:30

पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी नवी मुंबईकर सरसावले आहेत. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी ६० लाख रुपयांचा निधी दिला आहे.

Help for flood victims continues, Mathadi organization Donate 60 lacks | पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच, माथाडी संघटनेची ६० लाख रुपयांची मदत

पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच, माथाडी संघटनेची ६० लाख रुपयांची मदत

Next

नवी मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी नवी मुंबईकर सरसावले आहेत. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी ६० लाख रुपयांचा निधी दिला आहे. फळ व्यापाऱ्यांनी एका दिवसामध्ये पाच लाख ६२ हजार रुपये संकलित केले आहेत. शहरवासीयांनी धान्य, कपडे, औषधे संकलित करण्यास सुरुवात केली असून ही मदत लवकरच पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

देशात कुठेही नैसर्गिक आपत्ती उद्भवली की, नवी मुंबईकर सर्वात प्रथम मदतीसाठी धावून जात असतात. पूर, भूकंप, दुष्काळ व इतर सर्व संकटांमध्ये शहरवासी मोठ्या प्रमाणात मदत करत असतात. कोल्हापूर, सातारा व सांगलीमध्ये पूर आल्यानंतरही येथील जनतेने सढळ हस्ते मदत करण्यास सुरुवात केली आहे. महराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने तातडीने बैठक आयोजित केली होती. माथाडी कामगारांचे मूळ गाव पश्चिम महाराष्ट्रामध्येच आहे.

यामुळे सर्व कामगारांनी प्रत्येकी २०० रुपये मदत करण्याचे जाहीर केले आहे. सर्व कामगारांकडून तब्बल ५० लाख रुपये व महाराष्ट्र राज्य माथाडी पतपेढीच्या वतीने दहा लाख असे एकूण ६० लाख रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देण्यात येणार आहेत. या वेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, वसंत पवार, चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, अ‍ॅड. भारती पाटील, रमेश पाटील, पोपटराव देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

बाजार समितीमधील फळ व्यापाऱ्यांनी पूरग्रस्थांसाठी ११ लाख उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. शनिवारी काढण्यात आलेल्या मदतफेरीमध्ये एकाच दिवशी पाच लाख ६२ हजार रुपये मदत संकलित झाली आहे. भाजी, फळ व कांदा मार्केटमधून जवळपास २५ लाख रुपयांची मदत मिळेल, असा विश्वास व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे यांनी व्यक्त केला आहे.

नवी मुंबईमधील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व नागरिकांनी वैयक्तिक स्वरूपात मदत देण्यास सुरुवात केली होती. विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी मराठा भवनमध्ये शुक्रवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, डॉ. प्राची नरेंद्र पाटील, रवींद्र भगत, विजय माने, विनय मोरे, डॉ. प्रशांत थोरात, नगरसेवक प्रकाश मोरे, डॉ. जयाजी नाथ, प्रकल्पग्रस्त संघटनेचे नीलेश पाटील, दत्ता घंगाळे, बांधकाम व्यावसायिक प्रकाश बावीस्कर, काँगे्रसचे निशांत भगत, विजय वाळूंज, अजय वाळूंज, हरेश भोईर, राणी गौतम, कृष्णा पाटील, आबा रणवरे, सुनीता देशमुख व
इतर संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते. सर्वांनी नवी मुंबईमधून जास्तीत जास्त मदत पूरग्रस्तांसाठी उपलब्ध करून देण्याचा संकल्प करून प्रत्यक्ष संकलन सुरू केले आहे.

संघटनांचा पुढाकार
नवी मुंबईकरांकडून कोल्हापूर, सातारा, सांगली येथील पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू आहे. विविध संघटनांच्या माध्यमातून सर्व स्तरातून मदत मिळत आहे. त्यानुसार घणसोलीतील आधार ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू मदत स्वरूपात जमा केल्या जात आहेत. संस्थेचे अध्यक्ष राजू गावडे, विजय देशमुख, अशोक राऊत, राजेश गुप्ता आदीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार मंदा म्हात्रे, जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी नगरसेवक भरत जाधव, दत्ता घंगाळे व इतर पदाधिकाºयांनी पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली असून, कार्यकर्त्यांनी मदत संकलनही सुरू केले आहे.

पश्चिम महाराष्टÑ एकता मंचाकडून सांगली, कोल्हापूर येथे जनजीवन सुरळीत आणण्यासाठी श्रमदान केले जाणार आहे. पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली असून, इतरही अनेक प्रकारचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत सुधार करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासह स्थानिकांपुढे आहे. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर ठरावीक गावांमध्ये आवश्यक कामासाठी मदतीचा हात दिला जाणार आहे. त्याकरिता स्वयंसेवकांचे पथक तयार केले जाणार असल्याचे योगेश चव्हाण यांनी सांगितले. तर यामध्ये सहभागासाठी इच्छुक असणाºयांनीही सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

एपीएमसी आवारात मदतफेरी
पूरग्रस्त भागाला मदतीचे आवाहन करण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने एपीएमसी आवारात मदतफेरी काढण्यात आली. अध्यक्ष निशांत भगत यांच्या माध्यमातून राबवलेल्या या अभियानात संजय यादव, निजाम अली शेख, विजय वाळूंज, गोपीनाथ मालुसरे, विष्णू मेढकर, बंटी सिंग, सचिन शिंदे आदी सहभागी झाले होते. या वेळी नागरिकांकडून मदत स्वरूपात प्राप्त झालेल्या अन्नधान्यासह इतर जीवनावश्यक वस्तू जमा करून त्या प्रदेश युवक काँग्रेस सचिव स्नेहल डोके पाटील यांच्या मार्फत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवल्या जाणार असल्याचे निशांत भगत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नगरसेविका अंजली वाळूंज, विजय वाळूंज व अजय वाळूंज यांनी मदत संकलित केली.

नागरिकांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद
सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भगत व सहकाºयांकडून मदत संकलित केली जात आहे. शिरवणेमध्ये कै. विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ प्रभाग क्रमांक ८१ व ८९ च्या वतीने माजी नगरसेविका माधुरी सुतार, जयेंद्र सुतार यांच्या वतीने मदत संकलित केली जात आहे. कोपरी येथे नगरसेविका उषा भोईर, पुरुषोत्तम भोईर, शहरातील सर्व शिवसेना शाखांमध्ये मदत संकलित केली जात असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोकण भवनमध्येही मदत कक्ष
पूरग्रस्तांना मदत करता यावी, यासाठी कोकण भवनमध्येही ११ जुलैला मदत केंद्र सुरू केले जाणार आहे. नागरिकांनी ब्लँकेट, सतरंजी, लहान मुलांचे कपडे, साड्या, टॉवेल, बिस्कीट, मॅगी, चहा पावडर, साबन, दंतमंजन, साखर, मीठ व इतर वस्तू देता येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी दिली आहे.

देशात व राज्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवल्यानंतर माथाडी संघटनेच्या वतीने मदतीचा हात पुढे केला जातो. पश्चिम महाराष्ट्रात पूरसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे प्रत्येक कामगाराने प्रत्येकी २०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार व पतसंस्थेच्या माध्यमातून एकूण ६० लाख रुपयांची मदत केली जात आहे.
- नरेंद्र पाटील, माथाडी नेते

Web Title: Help for flood victims continues, Mathadi organization Donate 60 lacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.