पालिकेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मदतीचा हात
By admin | Published: June 29, 2017 03:03 AM2017-06-29T03:03:27+5:302017-06-29T03:03:27+5:30
महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊन दहावीमध्ये चांगले गुण मिळविणाऱ्या व शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवसेनेने मदतीचा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊन दहावीमध्ये चांगले गुण मिळविणाऱ्या व शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवसेनेने मदतीचा हात पुढे केला आहे. १४ विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रत्येकी २० हजार रुपयांची मदत दिली असून, यामध्ये पालिकेच्या घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मुलाचाही समावेश आहे.
नवी मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवू लागले आहेत. ५वी व ८वीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अनुप संजय देसाई, रितेश बिरूदेव वाघमोडे, सानिका कैलास गुंडाकर यांनी यश मिळविले आहे. दहावी परीक्षेमध्ये हरिकृष्ण तुकाराम बैनाळे, दरिया पकाराम चौधरी व आरती हरिशंकर गुप्ता यांनी ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्रातील पूजा बाळासाहेब निकम, प्रीतम अदिक गोसावी, विठ्ठल विजय रावळे, स्नेहल संतोष साळुंखे, साक्षी संजय पवार, प्रवीण भास्कर मोरे यांनीही यश मिळविले आहे.
पाचवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या शहरातील पालिका व खासगी मिळून ४२४ शाळांमधील ३४६५ विद्यार्थ्यांनी व ८वीमधील २८३० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा दिली होती. मनपा व खासगी शाळेतील एकूण ६२ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.
महापालिका शाळेतील १४ गुणवंत विद्यार्थ्यांचा बुधवारी शिवसेना नगरसेवक किशोर पाठकर यांनी विशेष सत्कार केला. या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये मदत केली आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागातील घंटागाडीवर काम करणाऱ्या तुकाराम बैनाळे यांचा मुलगा दहावीमध्ये पालिका शाळेत पहिला आला आहे. त्याचाही विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास परिवहन सदस्य विसाजी लोके व इतर मान्यवरही उपस्थित होते.