नवी मुंबई : पावसाळा संपल्यानंतरही राज्याच्या अनेक भागात अद्यापही मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामध्ये शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचे परिणाम संपूर्ण शेतकरी कुटुंबावर उमटत आहेत. याची दखल घेऊन नवी मुंबईकरांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे.
बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन करून सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या प्रमुख व्यक्तींची बैठक घेतली. त्यामध्ये ओल्या दुष्काळग्रस्त भागातील मुलांच्या मदतीसाठी त्यांनी स्वत:तर्फे एक लाख रुपये निधीची घोषणा केली, तसेच इतरांनीही मदतीसाठी हात पुढे करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनीही ५० हजार रुपयांची मदत दिली आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नवी मुंबईकरांकडून क्षमतेनुसार आर्थिक मदतीचा हात पुढे येत आहे. त्यानुसार नगरसेवक सूरज पाटील, नगरसेविका सुजाता पाटील, डॉ. राजेश पाटील, मनोज मेहेर, निखिल मांडवे यांनीही मदतीचा हात दिला आहे. ही मदत प्रत्यक्ष ग्रामीण भागात जाऊन तिथल्या बळीराजांच्या मुलांना दिली जाणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले. या बैठकीस विजय घाटे, सुहासिनी नायडू, माजी नगरसेवक सतीश रामाणे, रवींद्र भगत उपस्थित होते.पिकाचे नुकसानअतिवृष्टीनंतर राज्यात अवकाळी पावसामुळे अनेक भागांमध्ये ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या अवकाळी पावसामुळे राज्याच्या अनेक भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी कुटुंबातील मुलांवरही आर्थिक संकट कोसळले आहे.