नवी मुंबई, पनवेलसह उरणमध्ये हाय अॅलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 01:00 AM2019-06-18T01:00:10+5:302019-06-18T01:00:19+5:30
बंदोबस्तामध्ये वाढ; नागरिकांनीही सावध राहण्याची गरज
- नामदेव मोरे
नवी मुंबई : उलवेमधील पुलावर लिहिलेला मजकूर व कळंबोलीमध्ये सापडलेली बॉम्बसदृश वस्तूमुळे नवी मुंबईच्या सुरक्षेविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यापूर्वी दहशतवादी घटनांमधील व्यक्तींना झालेली अटक, ई-मेल हॅक प्रकरण व स्फोटांसाठी येथील वाहनांचा वापर झाल्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे पोलिसांनी शहरातील बंदोबस्त वाढविला आहे. नागरिकांनीही दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईलाही दहशतवादी हल्ल्यांचा धोका निर्माण होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी उरणमधील खोपटा पुलावर धमकीचा मजकूर लिहिण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीला अटक केली असली तरी त्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. खोपटा पुलाची घटना ताजी असताना कळंबोलीमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामधील बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. नवी मुंबईमध्ये अद्याप गंभीर दहशतवादी कारवाई झाली नसली तरी या कारवाईशी संंबंधित अनेक घटना या परिसरात घडल्याचे समोर आले होते. मुंबई गुन्हे शाखेने २०१६ मध्ये मुंबईमध्ये फारुख नायकू व मोहम्मद तालुकदार या दोन संशयित अतिरेक्यांना अटक केली होती. त्यांच्या पैकी नायकूने एपीएमसीमध्ये आश्रय घेतल्याचे स्पष्ट झाले होते. बाजार समितीमध्ये बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेटही सक्रिय झाले होते. मुंबई पोलिसांनी यामधील आरोपींना अटक केली होती.
गुजरातमध्ये २००८ मध्ये बॉम्बस्फोट झाले होते. त्या स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या दोन वॅगन आर कार नवी मुंबईमधून चोरी केलेल्या होत्या. यामुळे त्या स्फोटाचे कनेक्शन नवी मुंबईशी जोडले गेले होते. २०१६ मध्येही केरळ पोलिसांनी एक संशयित व्यक्तीला नवी मुंबईमधून अटक केली होती. २००८ मध्ये एक बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर पामबीच रोडवरील गुनिना बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या विदेशी नागरिकाचे अकाऊंट हॅक करून धमकीचा ई-मेल पाठविण्यात आला होता. वाशी सेक्टर १७ मधूनही अशाचप्रकारे ई-मेल हॅकिंगची घटना घडली होती. मार्च २०१८ मध्ये पोलिसांनी एबीटीच्या पाच संशयित दहशतवाद्यांना पनवेलमधून अटक केली होती. त्यांच्याकडे बनावट पॅनकार्ड व इतर साहित्य आढळून आले होते. एबीटीच्या संशयित दहशतवाद्यांना पॅनकार्ड काढून देणाºया टोळीलाही खारघरमधून अटक केली होती. या सर्व घटना व कळंबोलीमध्ये बॉम्बसदृश वस्तू सापडल्यामुळे नवी मुंबई, पनवेल व उरण परिसराच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. पोलिसांनीही शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद वस्तू आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
दक्षतेचे आवाहन
दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस वर्षभर जनजागृती करत असतात. कुठेही संशयास्पद वस्तू आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात यावी. एखाद्या व्यक्तीच्या हालचालींवर शंका वाटल्यास त्याचीही माहिती देण्यात यावी. घर भाडेतत्त्वावर देताना व नोकरी देतानाही संबंधितांची पुरेशी माहिती घ्यावी. भाडेकरूंची नोंद पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुरक्षेत वाढ
नवी मुंबई पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ केली आहे. सर्व पोलीस स्टेशनलाही दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. शहरातील गस्तही वाढविण्यात आली आहे. साध्या वेशातील पोलिसांची गस्तही सुरू करण्यात आली आहे.