तळा बँक आॅफ इंडियात पैसे जमा करण्याचा उच्चांक
By admin | Published: November 12, 2016 06:37 AM2016-11-12T06:37:07+5:302016-11-12T06:37:07+5:30
बँक आॅफ इंडिया शाखा तळा येथे १९८५ मध्ये सुरू करण्यात आली. गेली ३१ वर्षांत तळा शाखेत सर्वांत जास्त रक्कम गुरुवारी १० नोव्हेंबर २०१६ रोजी ग्राहकांकडून जमा करण्यात आली
तळा : बँक आॅफ इंडिया शाखा तळा येथे १९८५ मध्ये सुरू करण्यात आली. गेली ३१ वर्षांत तळा शाखेत सर्वांत जास्त रक्कम गुरुवारी १० नोव्हेंबर २०१६ रोजी ग्राहकांकडून जमा करण्यात आली. सुमारे दीड कोटी रक्कम या एकाच दिवसात बँकेत जमा केल्यामुळे ग्राहकांना कर्मचारी कमी असल्यामुळे त्रास सहन करावा लागला. बँकेचे अंतर्गत कामकाज उशिरापर्यंत सुरू होते, अशी माहिती बँक व्यवस्थापक प्रसून रंजन यांनी दिली.
तळा हा ग्रामीण विभाग असून भीतीपोटी ग्राहकांनी बँक उघडल्यावर बँक व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. १० नोव्हेंबरपेक्षा ११ नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच बँक आवारात ग्राहकांनी गर्दी के लीआहे. सुमारे दोन ते अडीच कोटींच्या आसपास रक्कम जमा होईल, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वत: तहसीलदार भगवान सावंत, पो. नि. संजय साबळे आणि त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. अतिशय शांततेत व संयमाने बँकेचे व्यवहार होत आहेत. परंतु सकाळपासूनच बँकेसमोर ग्रामीण भागातील नागरिक उभे आहेत. त्यांची नाष्टा जेवणाची गैरसोय झालेली ऐकिवात येत होती. भुकेपोटी काही व्याकूळ झालेले होते. पाणी देखील पिण्यासाठी रांगेतील नंबर जाईल या भीतीने कोणी जात नव्हते. बँक आॅफ इंडियाचे एटीएम गुरु वारी सकाळपासून सुरू झालेले आहे.
बँकेत येताना ग्राहकांनी पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड यासारखे ओळखपत्र सोबत आणावे. तर शनिवार, रविवार देखील सहकार्य करावे, असे आवाहन व्यवस्थापक प्रसून रंजन, सहा. व्यवस्थापक उज्ज्वल मिंज, चंद्रप्रकाश शामकुवर व केदार खातू आदिंनी केले. तसेच गुरु वारी पोस्ट आॅफिसमध्ये देखील सकाळपासून पैसे जमा करण्यासाठी गर्दी झाली होती. आज सुमारे दहा लाख रुपये नागरिकांनी पोस्ट कार्यालयात जमा केले आहेत, अशी माहिती पोस्ट मास्तर श्रीकांत मेजर यांनी दिली. दैनंदिन व्यवहारापेक्षा गुरु वारी दोन्ही ठिकाणी गर्दी पहावयास मिळाली. या सर्व गोष्टींचा बाजारपेठेवर खूपच परिणाम झालेला दिसत आहे. व्यापार ४० ते ५० टक्क्यांवर आला आहे, अशी व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहे. (वार्ताहर)